मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी नांदेडसह, सोलापूर, यवतमाळ, वर्धा, धुळे आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची नावे काँग्रेस संसदीय मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आली. नांदेडमधून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी आ.अमिता चव्हाण यांच्या नावाची पक्षश्रेष्ठींकडे शिफारस करण्यात येणार आहे.टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा समित्यांकडून आलेल्या नावांवर चर्चा झाली. या चर्चेअंती नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी आ. अमिता चव्हाण, सोलापुरातून सुशिलकुमार शिंदे, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, वर्धा येथून चारूलता टोकस, धुळ्यातून रोहिदास पाटील आणि दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांच्या नावाची दिल्लीतील केंद्रीय समितीकडे शिफारस करण्याचा निर्णय झाला. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला.या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले, २६ मतदारसंघातील उमेदवारांबाबत चर्चा झाली. जिंकून येण्याचा निकष लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न बैठकीत करण्यात आला. निश्चित केलेल्या उमेदवारांची यादी दिल्लीला पाठविण्यात येईल आणि तिथे उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होईल. नगरमध्ये आमच्याकडे जिंकून येणारा उमेदवार आहे. तिथे आमची परिस्थिती राष्ट्रवादीपेक्षा चांगली असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. या बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील निलंगेकर, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, विलास मुत्तेमवार, विजय वडेट्टीवार, संजय निरूपम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, नसीम खान यांच्यासह महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, संपत कुमार, वामशी रेड्डी, संपतकुमार, सोनल पटेल उपस्थित होते.
काँग्रेसचे सहा उमेदवार ठरले; एक मोठ्ठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 4:32 AM