“निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा”: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 07:06 PM2023-11-29T19:06:33+5:302023-11-29T19:07:09+5:30

Congress Balasaheb Thorat: सरकारने तातडीने मदत केली नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.

congress balasaheb thorat visit farmers to see damage due to unseasonal rain in nashik | “निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा”: बाळासाहेब थोरात

“निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा”: बाळासाहेब थोरात

Congress Balasaheb Thorat: मागील तीन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर, कापूस, कांदा सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदर खरीप वाया गेले, बहुतांश भागात रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी पिकं करपून गेली आहेत. त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उरले सुरली पिकं आणि फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने आता पंचनामे, पाहणी निकष यात न पडता शेतक-यांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.  

बाळासाहेब थोरात यांनी अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार, प्रशासकीय अधिकारी यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यातल्या बहुतांश भागात दुष्काळ आहे. अनेक ठिकाणी रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. या संकटामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत असताना आता झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. 

शेतकऱ्याला आधाराची आणि मदतीची गरज

नाशिक जिल्हाला या गारपिटीचा मोठा फटका बसला असून एकट्या नाशिक जिल्ह्यात ३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं आणि फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. मका, सोयाबीन, धान, कांदा, टोमॅटो, कांदा रोपवाटीका, ज्वारी, द्राक्षे यासह फळबागा गारपीटीने नष्ठ झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. बँकांकडून कर्ज घेऊन शेतक-यांनी या बागा जगवल्या होत्या. त्याला आधाराची आणि मदतीची गरज असून सरकारने पंचानामा, पाहणी, निकष याचे कागदी घोडे न नाचवता शेतक-यांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत तात्काळ द्यावी, असे थोरात म्हणाले. 

दरम्यान, राज्यातील सरकारचा पूर्वीचा अनुभव चांगला नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री मोठमोठ्या घोषणा करतात पण प्रत्यक्षात शेतक-यांना मदत मिळत नाही. खरीपाच्या हंगामात झालेल्या नुकसानीची सरकारने अद्याप भरपाई दिलेली नाही. शेतक-यांना पीक विमा ही मिळालेला नाही. पीकविमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत आहेत पण शेतक-यांना मदत देत नाहीत. सरकारने विमा कंपन्यांच्या मनमानीला चाप लावून शेतक-यांना विम्याची नुकसान भरपाई मिळवून द्यावी. सरकारने शेतक-यांना मदत करण्यास चालढकल केली तर हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरू असा इशारा थोरात यांनी दिला.

 

Web Title: congress balasaheb thorat visit farmers to see damage due to unseasonal rain in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.