राहुल गांधी-प्रियंका गांधींवर टीका; भाजपा आमदारावर बाळासाहेब थोरातांचा पलटवार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 11:09 IST2024-12-31T11:06:24+5:302024-12-31T11:09:22+5:30

Congress Balasaheb Thorat News: राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले.

congress balasaheb thorat replied bjp nitesh rane criticism on rahul gandhi and priyanka gandhi | राहुल गांधी-प्रियंका गांधींवर टीका; भाजपा आमदारावर बाळासाहेब थोरातांचा पलटवार, म्हणाले...

राहुल गांधी-प्रियंका गांधींवर टीका; भाजपा आमदारावर बाळासाहेब थोरातांचा पलटवार, म्हणाले...

Congress Balasaheb Thorat News: बीड आणि परभणी येथील प्रकरणावरून महाविकास आघाडीसह अन्य विरोधक महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा पूरेपूर प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. वाल्मीक कराडच्या अटकेवरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावर भाजपा आमदारांनी टीका केली. या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या टीकेचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत समाचार घेतला. 

केरळ हे मिनी पाकिस्तान असून राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी तिथे निवडून येते. सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत, असे आक्षेपार्ह विधान भाजपा आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. यावरून आता नवीन वाद निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नितेश राणे यांच्यावर बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केला आहे. 

नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत

केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक रित्या बोलताना, वागताना भान बाळगले पाहिजे पण नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत!, असे प्रत्युत्तर बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये बाळासाहेब थोरात पुढे म्हणतात की, जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे समीकरण भाजपमध्ये असल्याने मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या सहकाऱ्याला समजूत द्यावी, ही भाषा, हे वर्तन योग्य नाही, मंत्र्यांनी आपल्या पदाचे ग्रहण करताना शपथ घेतली आहे याची तरी आठवण ठेवावी आणि समाजात तेढ वाढणार नाही असे वर्तन करू नये!, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
 

Web Title: congress balasaheb thorat replied bjp nitesh rane criticism on rahul gandhi and priyanka gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.