Balasaheb Thorat: राजीनाम्यानंतर प्रथमच बाळासाहेब थोरात सर्वांसमोर आले; एकूणच प्रकरणावर स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 20:24 IST2023-02-12T20:23:44+5:302023-02-12T20:24:31+5:30
Balasaheb Thorat: विधानसभेतील गटनेतेपदाचा राजानामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Balasaheb Thorat: राजीनाम्यानंतर प्रथमच बाळासाहेब थोरात सर्वांसमोर आले; एकूणच प्रकरणावर स्पष्टच बोलले
Balasaheb Thorat: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजानामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अनेक दिवसांनंतर बाळासाहेब थोरात सर्वांसमोर आले आणि प्रसारमाध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली.
तुमची नाराजी दूर झाली का? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला होता. मात्र, यावर थेट भाष्य करणे बाळासाहेब थोरातांनी टाळल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर अध्यक्ष मल्लिकार्जुव खरगे याच्यासोबत बसून चर्चा करावी, असे मत एच के पाटील यांचे आहे. त्यामुळे चर्चा होईल. काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा होईल. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले.
रायपूर अधिवेशनाला जाणार आहे
मागील अनेक दिवसांपासून मी माध्यमांसमोर आलेलो नाही. माझा राजीनामा हा काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. माध्यमांनी त्याला खूप मोठे केले. माझी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनाला यावे, असा आग्रह केला आहे. मी या अधिवेशनाला जाणार आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मान्य करण्याचा विषयच येत नाही. बाळासाहेब थोरातांचे पूर्ण ऐकून घेतले. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षांना भेटलो होतो. याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच राज्यात झालेले गैरसमज त्यांच्यापर्यंत पोहोचवले. या समस्या लवकरच सोडवण्यात येतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि थोरात यांची भेट होणार आहे. तसेच थोरात यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, असे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांनी या बैठकीनंतर सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"