“भाजपाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला की काय?”; काँग्रेसची खोचक विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 10:01 IST2025-11-02T09:58:59+5:302025-11-02T10:01:16+5:30
Congress Satyacha Morcha: यादी दुरुस्त झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण निवडणूक आयोग ऐकूनच घेत नाही.

“भाजपाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला की काय?”; काँग्रेसची खोचक विचारणा
Congress Satyacha Morcha: सत्याचा मोर्चा हा मोर्चा एकट्या निवडणूक आयोगाच्याच विरोधात नाही तर जे लोक आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, देशातील निवडणुकीत मतचोरी झालेली आहे हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गाधी यांनी पुराव्यासह उघड करून दाखवले पण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर थातूर मातूर उत्तर दिले. निवडणूक आयोगाचे उत्तर हे इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. कोणतीही चौकशी न करता त्यांनी उत्तर दिले, असा दावा थोरात यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारयाद्या वापरण्यात आल्या
विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारयाद्या वापरण्यात आल्या, त्यासंदर्भात काँग्रेस पक्ष व मविआतील सर्व घटक पक्षांनी निवडणूक आयोगाला विचारणा केली व या बोगस मतदार याद्या वापरू नका असे सांगितले पण विधान सभेच्या बोगस याद्यांवर व त्यांवर घेतलेल्या हरकरतीवर कोणताही निर्णय घेतला नाही आणि आता तीच बोगस यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरली जात आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष त्या बोगस मतदार याद्यांच्या विरोधात आहोत आणि लोकशाही माननाऱ्यांनी त्याला विरोध करून मतदारयाद्या दुरुस्त करण्याचा आग्रह धरला आहे पण राज्य निवडणूक आयोग समाधान कारक उत्तर देऊ शकले नाही, असेही थोरात म्हणाले.
यादी दुरुस्त झाली पाहिजे हा आमचा आग्रह
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, माझ्या संगमनेर मतदारसंघातील ग्रामीण भागात साडे नऊ हजार बोगस मतदार आहेत, आम्ही त्यावर हरकत घेऊन त्या दुरुस्त करण्यास सांगितले पण तहसीलदार म्हणतात, दुरुस्ती करण्याचा आम्हाला काहाही अधिकारी नाही म्हणजे तीच बोगस मतदार यादी आता महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीला वापणार, म्हणून ती यादी दुरुस्त झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण निवडणूक आयोग ऐकूनच घेत नाही.
दरम्यान, सत्ताधारी भाजपाने काढलेल्या मूक मोर्चावर टीका करत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपला सत्याचा मोर्चा निघत असताना सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला आहे. या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे का? अशी शंका येते. ज्येष्ठ नेते शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनीही मोर्चाला संबोधित करून भाजपा महायुती सरकार व निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.