“अद्दल घडवा, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:34 IST2025-04-04T17:32:23+5:302025-04-04T17:34:27+5:30
Congress Atul Londhe News: कडक कारवाई करण्याची धमक सरकारने दाखवावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

“अद्दल घडवा, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; काँग्रेसची मागणी
Congress Atul Londhe News: पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात संताप व्यक्त करत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय नोंदणी असलेले रुग्णालय आहे, जनतेच्या कराच्या पैशातून ते उभे राहिले आहे, सरकारने या रुग्णालयाला एक रुपयाने जमीन दिली आहे. पण या रुग्णालयात सामान्य लोकांना लुटण्याचे काम होत आहे. मयत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाने २० लाख रुपयांचा खर्च येईल व १० लाख रुपये आधी भरा असे सांगितल्याचे समजते. २० लाख रुपये एवढी मोठी रक्कम मध्यमवर्गीय कुटुंबालाही परवडणारी नाही. पैशासाठी या रुग्णालयाने एका मातेचा बळी घेतला आहे, दोन बालके आईच्या प्रेमाला व दुधाला मुकली आहेत, हे अत्यंत गंभीर आहे, अशी टीकाही लोंढे यांनी केली.
कडक कारवाई करण्याची धमक देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवावी
या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा कांगावा रुग्णालय प्रशासन करत आहे, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. अशा मुजोर रुग्णालयावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणते बाळ आईच्या मायेला पोरके होणार नाही, अशी कडक कारवाई करण्याची धमक देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवावी, असेही अतुल लोंढे म्हणाले.
दरम्यान, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कारवाई केली आहे. रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.