महागाईवरून काँग्रेस आक्रमक

By Admin | Updated: July 2, 2014 00:58 IST2014-07-02T00:58:23+5:302014-07-02T00:58:23+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढ, पेट्रोल-डिझेल, साखर, गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात मंगळवारी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

Congress aggressive from inflation | महागाईवरून काँग्रेस आक्रमक

महागाईवरून काँग्रेस आक्रमक

महालात रास्ता रोको : पंतप्रधान, पेट्रोलियम मंत्र्यांचा पुतळा जाळला
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढ, पेट्रोल-डिझेल, साखर, गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात मंगळवारी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. महालातील घाटे दुग्ध मंदिरसमोरील चौकात आंदोलन करीत रास्ता रोको केला. ‘अच्छे दिन कैसे आयेंगे ?’असा सवाल करीत कार्यकर्त्यांनी पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्र्यांचा पुतळा जाळला. यावेळी पोलिसांनी पुतळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, या दरवाढीचा विविध संघटनांनी निषेध केला.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात दुपारी २ च्या सुमारास आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते सरकार विरोधी घोषणांचे फलक घेऊन होते. महापालिकेची सभा संपल्यानंतर काँग्रेस नगरसेवकही यात सहभागी झाले. महिला नगरसेविकांची लक्षणीय उपस्थिती होती. युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसची टीमही तैनात होती. यावेळी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्यामुळे अर्धा तास ट्रॅफिक जाम झाला. यानंतर कार्यकर्त्यांनी पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळा आणला. हा पुतळा हिसकावण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते नमले नाहीत. पोलिसांची नजर चुकवून पुतळे जाळण्यात आले. नंतर मात्र पोलिसांनी जळत असलेले पुतळे विझवून ताब्यात घेतले.
आंदोलनात नगरसेविका आभा पांडे, रेखा बाराहाते, शीला तराळे, शीला मोहोड, निमिषा शिर्के, राजश्री पन्नासे, प्रेरणा कापसे, उज्ज्वला बनकर, नंदनवार, सिंधू उईके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, नगरसेवक संजय महाकाळकर, अमान खान, गुड्डू तिवारी, वासुदेव ढोके, अभिजित वंजारी, पंकज लोणारे, प्रशांत कापसे, राजू व्यास, उमाकांत अग्निहोत्री, गजराज हटेवार, दीपक वानखेडे, युवक काँग्रेसचे कुमार बोरकुटे, रितेश सोनी, चक्रधर भोयर, सचिन सातपुते, रोहित खैरवार, विशाल साखरे, आशिष दीक्षित, नीलेश खोरगडे आदी सहभागी झाले होते.
अ.भा. ग्राहक कल्याण परिषद
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलची दरवाढ करून जनतेच्या खिशाला कात्री लावली आहे. सरकारने ‘अच्छे दिन’ आणण्याचे दाखविलेले स्वप्न फोल ठरले आहे. अच्छे दिन केवळ मंत्र्यांचे आले आहे. सरकार इराक घटनेचे कारण सांगून जनतेला फसवीत आहे. तीन दिवस पेट्रोल पंप चालकांचा संप राहील, अशी अफवा पसरवून ग्राहकांना फसविले आहे. त्यांच्याकडून करोडो रुपयांची वसुली केली आहे. याचा निषेध अ.भा. ग्राहक कल्याण परिषदेने केला आहे. येत्या ४ जुलैला परिषद पंचशील चौकात गांधीगिरी करून सरकारच्या निर्णयाचा निषेध करणार आहे.
महाराष्ट्र सेल्स अ‍ॅण्ड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह असो.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सामान्य जनतेवर महागाईच्या काळात आर्थिक बोझा पडला आहे. सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापासून फारकत घेतली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जनतेमध्ये रोष आहे. संघटनेतर्फे या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. संघटना दरवाढीच्या विरोधात आंदोलन करणार आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी
मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निषेध केला आहे. यूपीए सरकारच्या काळात भाजपा अशा दरवाढीचा विरोध करीत होती. मात्र सत्तेवर आल्यावर भाजपानेही यूपीए सरकारची धोरणे कायम ठेवून, आणखी तीव्रतेने राबवीत आहे. सत्तेत आल्यास महागाईवर नियंत्रण, अशी आश्वासने जनतेला दिली होती. परंतु आज महागाईचा बोझा आणखी वाढतो आहे.
याचाच अर्थ भाजपाजवळ पर्यायी धोरणे नाहीत, हेच सिद्ध झाले आहे. विकासाचा आधार जर सामान्य जनतेवर बोझा लादण्याचा असेल तर, जनतेने त्याचा कसून विरोध करण्याचे आवाहन पक्षाने केले आहे. बुधवार, २ जुलै रोजी पक्षातर्फे व्हेरायटी चौकात निदर्शने करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Congress aggressive from inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.