लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूर शांत शहर आहे. १९९२ नंतर शहरात कधीच दंगल घडली नाही. त्यामुळे १७ मार्चला घडलेली दंगल दुर्दैवी आहे. यात अनेकांचे नुकसान झाले असून, त्यांना आगामी चार दिवसांत नुकसानभरपाई देण्यात येईल; परंतु ही भरपाई शासन दंगेखोरांची संपत्ती विकून वसूल करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून दंगलीचा आढावा घेतला. बैठकीनंतर पोलिस भवनातील ऑडिटोरिअममध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, औरंगजेबाची प्रतीकात्मक कबर सकाळी जाळल्यानंतर काहींनी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र, धार्मिक मजकूर लिहिलेली चादर जाळल्याचा भ्रम करून सोशल मीडियावर अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे सायंकाळी जमावाने तोडफोड सुरू केली, वाहने पेटविली. पोलिस आणि नागरिकांवर हल्लादेखील केला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, प्रतिबंधात्मक कारवाई करून चार ते पाच तासांत दंगलीवर नियंत्रण मिळविले. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून आतापर्यंत १०४ जणांना अटक केली. यात ९२ आरोपी, १२ विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. आणखी फुटेज तपासून अखेरच्या दंगलखोराला अटक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. टप्प्याटप्प्याने कर्फ्यू हटविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले...
तपासानंतर कळेल हात कुणाचा?
दंगलीत विदेशी, बांगलादेश, मालेगावचा हात आहे का, याबाबत आताच बोलणे सयुक्तिक होणार नाही. चौकशी सुरू आहे. तपासानंतर कुणाचा हात आहे, हे समोर येईलच.
महिला पोलिसाचा विनयभंग नाही...
दंगलीत महिला पोलिसाचा विनयभंग केल्याच्या बातम्या झळकल्या. महिला पोलिसावर हल्ला झाला. मात्र, अभद्र व्यवहार करण्यात आला नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्यावर परिणाम नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यात कोणताही बदल नाही. पंतप्रधान ३० मार्चला नागपूर दौऱ्यावर आहेत.
गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही; पण...
नागपुरात भडकलेल्या हिंसाचाराबाबत गुप्तचर यंत्रणांचे अपयश असे म्हणता येणार नाही; पण अधिक चांगले इनपुट्स गुप्तचर यंत्रणा देऊ शकली असती.
जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल
हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या इरफान अन्सारी (३८, रा. बंदे नवाजनगर) या युवकाचा शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत एका आरोपीला अटक केली आहे. संतोष श्यामलाल गौर (४८, रा. खदान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इरफान सोमवारी हंसापुरीजवळ गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. इरफानच्या कुटुंबात पत्नी आणि १७ वर्षांची मुलगी आहे. तो वेल्डिंगचे काम करीत होता. तो इटारसीला जाण्यासाठी ऑटोत बसून रेल्वेस्थानकावर जात होता. हिंसाचार सुरू झाल्यामुळे ऑटोचालकाने इरफानला सीए रोडवर उतरवून दिले. इरफान पायी निघाले होते. जमावाने पकडून धारदार शस्त्राने वार केले.