बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री मिसाळ यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 06:07 IST2025-07-16T06:07:05+5:302025-07-16T06:07:25+5:30
आ. सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून बागलाणमध्ये तब्बल ३५ बोगस डॉक्टर महाराष्ट्र रुरल हेल्थ असोसिएशन संस्थेचे प्रमाणपत्र मिळवून वैद्यकीय प्रॅक्टिस करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री मिसाळ यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बोगस डॉक्टर आणि पॅथॉलॉजी लॅबविरोधातील कठोर कायदा तयार करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली जाईल. पोलिस, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, कायदा या विभागांसह इंडियन मेडिकल कौन्सिलचा समितीमध्ये समावेश असेल, अशी घोषणा नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.
आ. सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून बागलाणमध्ये तब्बल ३५ बोगस डॉक्टर महाराष्ट्र रुरल हेल्थ असोसिएशन संस्थेचे प्रमाणपत्र मिळवून वैद्यकीय प्रॅक्टिस करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही?
राज्यमंत्री मिसाळ यांनी उत्तर देताना, बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी क्यू आर कोड आधारित यंत्रणा विकसित
केली असून त्याद्वारे डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची माहिती मिळते.
मात्र, तांत्रिक उपाय पुरेसा नसून यासाठी कायद्यात सुधारणा करणे अनिवार्य आहे. या कायद्याच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ठोस निर्णय घेतले जातील, तर बोगस डॉक्टर आणि पॅथॉलॉजीविरोधात उपाययोजना व सूचना ऐकण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल, असे सांगितले.