गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:53 IST2025-12-17T18:53:39+5:302025-12-17T18:53:39+5:30
Minister Nitesh Rane News: आमच्या गडकिल्ल्यांवर कोणाची वाकडी नजर खपवून घेणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Minister Nitesh Rane News: महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या समितीचे सह-अध्यक्ष म्हणून महसूल मंत्री, वन मंत्री आणि मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी या निर्णयाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. मी स्वतः या समितीचा सदस्य आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे हटवायला गेले की लोक जमा होतात. अनेक वेळा अशा ठिकाणी हत्यारेही सापडली आहेत. इतिहास पुसण्याचे काम काही लोकांकडून होत आहे. आमच्या गडकिल्ल्यांवर कोणाची वाकडी नजर खपवून घेणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. उद्यापासून या दिशेने कारवाई सुरू होईल. आमच्या समितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या विषयावर तडजोड न करणारे लोक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईचा डीएनए हिंदुत्व
मंत्री नितेश राणे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, मुंबईचा डीएनए हिंदुत्व आणि महादेव आहे. ‘आय लव्ह पाकिस्तान’ बोलणारे येथे चालणार नाहीत. महादेवावर प्रेम करणारी आणि त्यांच्या विचारांवर चालणारी व्यक्तीच मुंबईची महापौर होईल. आम्हाला मुंबईत घाण ठेवायची नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मुंबई वाचवली. ते विकले गेले नाहीत, असे नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर केलेल्या वक्तव्याचा मंत्री नितेश राणे यांनी समाचार घेतला. पृथ्वीराज चव्हाण यांना सांगा, विषय निघून गेलेला आहे. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणारा पक्ष आहे, यात नवीन काही नाही. पाकिस्तानचे हिरवे झेंडे मिरवणुकीत फिरवले जात होते, हे आम्ही विसरलेलो नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.