उत्तरेकडील वाऱ्यांमुळे परतली थंडी! राज्यात पुढील तीन दिवस राहणार कडाका खूप जास्त राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 06:44 IST2025-01-05T06:41:18+5:302025-01-05T06:44:23+5:30
राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान ११ अंश, तर मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले

उत्तरेकडील वाऱ्यांमुळे परतली थंडी! राज्यात पुढील तीन दिवस राहणार कडाका खूप जास्त राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा एकदा वेग पकडला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली आला आहे. राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान ११ अंश, तर मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, पुढील तीन दिवस थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
३ जानेवारी रोजी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले होते, तर ८ वर्षांपूर्वी २०१६ साली जानेवारी महिन्यात मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कमाल तापमान ३४ ते ३५ होते. त्यानंतर ८ वर्षांनी हिवाळ्यात जानेवारीत पारा पुन्हा ३६ नोंदविण्यात आला. रात्री थंड वारे वाहत आहेत. दिवसा पूर्वेकडून गरम वारे वाहत आहेत. त्यामुळे दिवसाचे तापमान अधिक आहे, तर रात्रीचे तापमान कमी आहे.
कुठे आहे थंडी (तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
- पालघर : १२.९
- मुंबई : १६.२
- ठाणे : २१.२
- रत्नागिरी : १८.९
- परभणी : ११
- नाशिक : १०.१
- अहिल्यानगर : ७.७
- छ. संभाजीनगर : ११.६
- डहाणू : १६.७
- जळगाव : ९.६
- कोल्हापूर : १५.३
- महाबळेश्वर : १३.८
- नांदेड : ११.२
- नंदुरबार : १२.८
- धाराशीव : १२.३
मधल्या काळात हवामानात बदल झाले होते. त्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याला अडथळा निर्माण झाला होता. परिणामी, थंडी कमी झाली होती. आता वातावरण निवळले आहे. थंडीच्या कडाक्यामुळे मुंबईचे किमान तापमान १४ अंश नोंदविण्यात आले होते. आता मात्र तसा गारठा नसल्याने पारा १६ आहे.
- अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक
३ जानेवारीपासून पहाटेच्या किमान तापमानात घसरण होत आहे. शनिवारी राज्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीइतके, तर भागपरत्वे बऱ्याच ठिकाणी अर्ध्या डिग्रीपासून ते साडेतीन डिग्रीपर्यंत खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात थंडीत वाढ होत आहे, तर दुपारी ३ चे कमाल तापमान महाराष्ट्रात भागपरत्वे सरासरीपेक्षा एक डिग्रीपासून ७ डिग्रीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे दिवसा ऊबदारपणा तर रात्री थंडी आहे.
- माणिकराव खुळे, हवामान अभ्यासक