कोणत्याही क्षणी आचारसंहिता, मंत्रालयात लगबग; पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक

By दीपक भातुसे | Published: March 8, 2024 08:20 AM2024-03-08T08:20:27+5:302024-03-08T08:21:07+5:30

पहिल्यांदाच अशा प्रकारे एका आठवड्यात सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक होत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Code of conduct at any moment; For the first time, two consecutive days of cabinet meeting | कोणत्याही क्षणी आचारसंहिता, मंत्रालयात लगबग; पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक

कोणत्याही क्षणी आचारसंहिता, मंत्रालयात लगबग; पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्याच्या शेवटी जाहीर होणार असल्याची चर्चा असून त्याचे पडसाद राज्याच्या कारभारावरही  उमटलेले दिसून येत आहेत. आचारसंहिता लागायला थोडेच दिवस शिल्लक असल्याने मंत्रालयात निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे. त्या अनुषंगाने पुढील आठवड्यात सोमवार ११ आणि मंगळवार १२ मार्च असे सलग दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे एका आठवड्यात सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक होत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

आतापर्यंत झाल्या ६६ मंत्रिमंडळ बैठका 
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर स्थापन झालेल्या सरकारच्या आतापर्यंत ६६ मंत्रिमंडळ बैठका झाल्या असून, त्यात ५००च्यावर निर्णय घेण्यात आले आहेत.  पुढील आठवड्यात सलग दोन दिवस होणाऱ्या बैठकांनंतर हा आकडा ६८ वर पोहोचेल.

लोकप्रिय निर्णयांची शक्यता 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे चालू आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही. त्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारला अनेक लोकप्रिय निर्णय घ्यायचे आहेत, शिवाय आमदारांच्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित निर्णय मार्गी लावायचे आहेत. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची संख्या मोठी असते. त्यामुळे या दोन दिवसांच्या बैठकांमधून किती निर्णय घेतले जातात याबाबत उत्सुकता आहे.

जीआर जारी करण्याची धावपळ 
आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय (जीआर) जारी करण्याची लगबग मंत्रालयात सुरू आहे. अनेक योजनांसाठी किंवा सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी देण्याचे निर्णय घेतले आहेत. मात्र त्याचे शासन निर्णय जारी झालेले नाहीत. शासन निर्णय जारी झाल्याशिवाय प्रत्यक्ष निधी मिळत नाही. 

त्यामुळे असे प्रलंबित शासन निर्णय काढण्याची घाई सध्या सुरू आहे. दुसरीकडे मंत्रालयात आणि मुख्यमंत्री कार्यालयात अभ्यागतांची गर्दीही वाढलेली पाहायला मिळते आहे. प्रामुख्याने बदल्या आणि निधीसाठी लोकांची गर्दी मंत्रालयात दिसत आहे. काही विभागात तर फाईल तयार होण्याआधी जीआर काढण्याची घाई सुरू असल्याचे दिसून आले. आधी जीआर काढा, फाईलवर सही होणारच आहे, असा प्रकार सुरू आहे.

Web Title: Code of conduct at any moment; For the first time, two consecutive days of cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.