cm uddhav thackeray hits back to mns chief raj thackeray over hindutva remark | जशास तसं! राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात प्रत्युत्तर
जशास तसं! राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात प्रत्युत्तर

मुंबई: मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो, या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वचनपूर्वी मेळाव्यातून प्रत्युत्तर दिलं. मी भगवा खाली ठेवलेला नाही, तर आमचं अंतरंगच भगवं आहे, असा टोला उद्धव यांनी राज ठाकरेंना लगावला. मुंबईतल्या बीकेसीमध्ये शिवसैनिकांकडून उद्धव यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

'शिवसैनिक मुख्यमंत्री होणार हे वचन मी बाळासाहेबांना दिलं होतं. तसा शब्द मला भाजपाकडूनही देण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांनी तो शब्द फिरवला. बाळासाहेबांची खोली शिवसैनिकांसाठी मंदीर आहे. या खोलीत दिलेलं आश्वासन भाजपानं मोडलं. मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. तसं झालं असतं तर मी शिवसैनिकांसमोर कसा जाऊ शकलो असतो,' असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. मी केवळ उद्धव ठाकरे नाही, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. त्यामुळे कधीही जबाबदारीपासून पळ काढलेला नाही आणि यापुढेही काढणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

मित्रपक्षानं विश्वासघात केल्यानं विरोधकांसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. यावरुन शिवसेनेचा चेहरा उघडा पडला, अशी टीका होते. मात्र २०१४ मध्ये तुम्ही संपूर्ण उघडे झाला होतात, त्याचं काय, असा प्रश्न उद्धव यांनी विचारला. २०१४ मध्ये तुम्ही युती तोडली. तेव्हा सत्ता स्थापन करताना अदृश्य हातांची मदत घेतलीत. तेव्हा तुम्ही पूर्ण उघडे झालात, अशी टीका उद्धव यांनी भाजपावर केली. 

शिवतीर्थावर शपथ घेताना मला जुन्या शिवसैनिकांची आठवण येत होती, असं उद्धव यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांना सिंहासनाच्या दिशेनं पाऊल टाकताना प्रत्येक पावलावर स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची आठवण झाली. महाराजांची ही भावना होती, तर त्यांना दैवत मानणारे आम्ही त्यांच्यासमोर कस्पटासमान आहोत, असं उद्धव म्हणाले. शिवसैनिक माझे सुरक्षाकवच आहेत. त्यांचे आमच्या कुटुंबावर उपकार आहेत. त्यामुळे त्यांचा विश्वासघात ठाकरे कुटुंबाकडून कधीही होणार नाही, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 
 

Web Title: cm uddhav thackeray hits back to mns chief raj thackeray over hindutva remark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.