उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 00:13 IST2025-08-03T00:12:26+5:302025-08-03T00:13:36+5:30
Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते महायुती सरकारशी संबंधित मुद्यांपर्यंत विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा यांचा लोकप्रिय कार्यक्रम 'आप की अदालत' मध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते महायुती सरकारशी संबंधित मुद्यांपर्यंत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीच्या शक्यतेवरही भाष्य केले.
देवेद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवृत्तीनिमित्ताने सभागृहात बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना महायुतीसोबत येण्याची खुली ऑफर दिली. मात्र, त्यानंतर फडणवीस यांनी गंमत केल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, बुधवारी एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. याबाबत रजत शर्मा यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "सर्वातप्रथम मी हे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत. आमचे सरकार पुढील पाच वर्षे चालेल. उद्धव ठाकरेंबद्दल सांगायचे झाले तर, मी त्यांना कोणतीही ऑफर दिली नाही. हा एक विनोद होता. परंतु, माझ्या विनोदाची बातमी बनली. सध्या ऑफर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण आता आमच्याकडे जागा नाही. २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत आमचे २३२ सदस्य आहेत. त्यामुळे शक्य नाही."
उद्धव ठाकरेंची महायुतीशी युती शक्य नाही, मग बंद दाराआड तुमच्यात नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, असा रजत शर्मा यांनी प्रश्न करताच फडणवीस म्हणाले की, "आमच्यात बंद दाराआड चर्चा झाली नाही, आधी हे मी स्पष्ट करतो. उद्धव ठाकरे हे एका शिष्टमंडळासह आले होते, कमी संख्याबळ असूनही त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. प्रथम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आले. त्यानंतर त्यांनी इतरांना बोलावून घेतले. आमच्यात १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर ते निघून गेले. माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत, पण याचा अर्थ असा नाही की, आपण बाजू बदलू. महायुतीत कोणताही बदल होणार नसून हेच कॉम्बिनेशन पुढेही पाहायला मिळेल", असे फडणवीस म्हणाले.