नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
राज्य सरकारने गडचिरोली येथे पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला येत्या काळात माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबतदेखील फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली. यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना १५व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान मोदी यांनी दिला.
वर्ल्ड ऑडिओ, व्हिज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट मुंबई येथे आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
ऑडिओ आणि व्हिज्युअल क्षेत्रातील दिग्गज मुंबईत येणार
माहिती-तंत्रज्ञान आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातील दिग्गजांची 'वेव्हज् २०२५' ही चार दिवसीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ही परिषद १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तसाठी 'वेव्हज् २०२५' बाबत बैठक आयोजित केली होती. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, क्रिएटिव्ह इंडस्ट्री ही सर्वांत वेगाने वाढणारी ५० बिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे. अशात, ऑडिओ आणि व्हिज्युअल क्षेत्रात क्रिएटिव्ह काम करणाऱ्या जागतिक ख्यातीच्या किमान शंभर कंपन्यांचे प्रमुख या परिषदेत सहभागी होणार आहेत. क्रिएटिव्हिटी क्षेत्रातील ही सर्वांत मोठी परिषद असेल.
केंद्र सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही इन्स्टिट्यूट गोरेगाव येथे होणार असून, केंद्र सरकार ४०० कोटी रुपये खर्च करणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.