Eknath Shinde : "बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच..."; गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंचं खास ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 09:04 IST2022-07-13T08:54:16+5:302022-07-13T09:04:25+5:30
Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गुरुपौर्णिमेनिमित्त एक ट्विट केलं आहे.

Eknath Shinde : "बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच..."; गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंचं खास ट्विट
मुंबई - आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात गुरूला देवा इतकेच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गुरुपौर्णिमेनिमित्त एक ट्विट केलं आहे. "बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच" असं म्हटलं आहे.
"बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही.... गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन..." असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे. मी एक सामान्य शिवसैनिक आहे, मुख्यमंत्रिपद माझ्या डोक्यात कधीही जाणार नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी वाटेला आले तर सोडतही नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठणकावून सांगितले.
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही....
गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन...#गुरुपौर्णिमाpic.twitter.com/NKYUBOYQXk
हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अनेक गाड्या भरून शिवसैनिक त्यासाठी आले होते. त्यांच्यासमोर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री झालो असलो तरी मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. तुमच्या कुटुंबातलाच एक माणूस सहाव्या मजल्यावर बसला आहे असे समजा.शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे अगदी विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असताना ऐनवेळी शिंदे गटात सहभागी झाले होते.
बांगर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखपदावरून हटविले होते. मात्र, बांगर हेच जिल्हाप्रमुखपदावर कायम असतील, असे शिंदे यांनी सांगितले. आधीच्या काळात शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले, तडीपाऱ्या झाल्या. मात्र मी मुख्यमंत्री असताना एकाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही. पुढच्या अडीच वर्षांत एकाही शिवसैनिकाचा बाल बांका करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असेही शिंदे यावेळी म्हणाले.