CM देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उडी, तीन दिवसांचा कार्यक्रम काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 09:02 IST2025-01-29T09:00:21+5:302025-01-29T09:02:01+5:30
Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. दिल्लीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सभा घेणार आहेत.

CM देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उडी, तीन दिवसांचा कार्यक्रम काय?
Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, प्रचारासाठी मोजकेच दिवस राहिले आहेत. सर्वच पक्षांनी दिल्लीत ताकद पणाला लावली असून, भाजपनेही प्रचारकांची फौज मैदानात उतरवली आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही जाणार आहेत. तीन दिवस मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत असणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्लीत सत्ताधारी आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे. पुन्हा एकदा सत्ता राखण्यासाठी आपने सर्वस्व पणाला लावले आहे, तर दुसरीकडे भाजपने दिल्लीचा गड मिळवण्यासाठी प्रचारात झोकून दिल्याचे दिसत आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. दावोस दौऱ्यामुळे त्यांना दिल्लीतील प्रचाराला जाता आले नाही. आता अखेरच्या टप्प्यात ते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस तीन दिवस दिल्लीत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारपासून म्हणजेच 29 ते 31 जानेवारी असे तीन दिवस दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारासाठी जाणार आहेत.
29 जानेवारी रोजी दिल्लीतील रोहिणीतील सेक्टर 9 मधील डीसी चौक येथे त्यांची प्रचारसभा होणार आहे.
त्यानंतर पहाडगंज भागात मराठी प्रकोष्ठ बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. 30 आणि 31 जानेवारी रोजी सुद्धा त्यांच्या दिल्लीत प्रचारसभा होणार आहेत.
भाजपच्या इतर मुख्यमंत्र्यांच्या सभा
दिल्लीत भाजपच्या इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांच्याही प्रचारसभा झाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दिल्लीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. हरयाणाचे भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनीही दिल्लीत प्रचारसभा घेतल्या आहेत.