"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:57 IST2025-10-13T16:18:17+5:302025-10-13T16:57:28+5:30
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
CM Devendra Fadnavis On Priyank Kharge Letter:कर्नाटकातराष्ट्रीय स्वयंसेवक संघावरुन एक मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे ग्रामीण विकास आणि आयटी मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी जागेत आरएसएसच्या कार्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. प्रियांक खरगेंच्या मागणीवरुन भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना प्रियांक खरगेंचे वक्तव्य हे प्रसिद्धीसाठी असल्याचे म्हटलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारी शाळा, क्रीडांगणे आणि मंदिरांमध्ये शाखा आणि बैठका आयोजित करून मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये फूट पाडणारे विचार पसरवत असल्याचे मंत्री प्रियांक खरगे यांनी म्हटलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना संविधानाच्या तत्वांविरुद्ध काम करतोय आणि तिचे कार्यकर्ते मुलं आणि तरुणांमध्ये अशांतता पसरवत आहेत, ज्यामुळे भारताची एकता आणि अखंडता धोक्यात येत असल्याचे प्रियांक खरगे यांनी म्हटलं. प्रियांक खरगे यांच्या पत्रानंतर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
भाजपने या मुद्द्यावरील पत्राचा निषेध करत काँग्रेसचे सरकार लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठीचा संघर्षाला लपवण्यासाठी हे करत असल्याचे म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशा पत्रांकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे म्हटलं.
"कर्नाटकचे प्रियांक खरगे हे प्रसिद्धीसाठी असल्या गोष्टी करत असतात. ते वडिलांच्या भरवश्यावर राजकारण करत आहेत. यापूर्वी अनेकवेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. इंदिरा गांधी यांनी संघावर बंदी घातल्यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलं. संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. देशभक्त संघटन आहे. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित, मूल्याधिष्टित अशा प्रकारच्या मानवनिर्मितीचे कार्य संघ करते. प्रसिद्धीकरता जे अशा प्रकारचे जे पत्र देतात त्याच्याकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आरएसएसची विचारसरणी धोकादायक - प्रियांक खरगे
"आरएसएस खाजगीरित्या असे कार्यक्रम आयोजित करू शकते. आम्हाला त्यात काही अडचण नाही, पण सरकारी जमिनीवर आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी. आरएसएसची विचारसरणी धोकादायक आहे. जर तसे नसते, तर आरएसएस नेते त्यांच्या घरात ते आचरणात आणत नसतील का? मनुस्मृतीच्या बाजूने संविधानाला विरोध करणारा आरएसएसच नव्हता का?," असा सवाल प्रियांक खरगे यांनी केला.