“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:59 IST2025-10-28T14:57:29+5:302025-10-28T14:59:01+5:30
CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे...

“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
CM Devendra Fadnavis News: आत्तापर्यंत सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या अंतर्गत ८ हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. जवळपास ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहचले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून ११ हजार कोटी रुपये वितरीत करण्याला मान्यता देण्यात आली. हे बजेटमधील पैसे नसल्याने याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. हेही पैसे पुढच्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचवण्याचे आदेश आम्ही दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यामध्ये अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जारी करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मदतीचा आढावा घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही. आता दिला गेलेला निधी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेला आहे. काही ठिकाणी तो अंशतः गेला आहे. याचे कारण म्हणजे आम्ही एक निर्णय घेतला होता, की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सर्व याद्यांसाठी थांबायचे नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये
आदित्य ठाकरे यांनी मतदारयाद्यांमधील घोळाची माहिती समोर आणली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये. मी त्यांना महाराष्ट्र पप्पू म्हणणार नाही. राहुल गांधी जशी मोठी स्क्रीन लावतात. येरझाऱ्या घालतात. पण खोदा पहाड, चुहा भी नही निकला, असे असते. आदित्य ठाकरेंनी हेच केले. त्यांची उत्तर निवडणूक आयोगाने दिलेली आहेत. आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी राहुल गांधी बनू नये, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, कोणी शंका बाळगण्याची गरज नाही की, आम्हाला तर एनडीआरएफचे पैसे मिळाले पण १० हजार मिळाले नाहीत. १० हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत. ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही टाकतोय. पुढच्या १५ ते २० दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जातील. ९० टक्क्यांपर्यंत शेतकरी आम्ही या १५ ते २० दिवसांत कव्हर करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.