“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 20:08 IST2025-09-14T20:04:37+5:302025-09-14T20:08:41+5:30

CM Devendra Fadnavis PC News: २०१४ ते २०२५ मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजासाठी झाले, ते आमच्या सरकारने केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

cm devendra fadnavis said whether obc or maratha the government can only do the best for the welfare of the entire community | “ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis PC News: दोन्ही बाजूंनी राजकारण चाललेले आहे. आम्ही काढलेला जीआर ओबीसींच्या कोणत्याही हक्कांवर गदा आणणारा नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही. ओबीसी नाही, असा कोणताही व्यक्ती समाविष्ट होणार नाही, अशा प्रकारची काळजी त्या जीआरमध्ये घेतलेली आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

राज्य सरकारने काढलेल्या जीआरबाबत ओबीसी नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत टीका केली. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेचे स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले की, वडेट्टीवारांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. याचे कारण ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे, ते आमच्या सरकारने केले आहे. २०१४ ते २०२५ मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजासाठी झाले, ते आमच्या सरकारने केले. 

२७ टक्के पूर्ण ओबीसींचे आरक्षण आणणारे आमचे सरकार

ओबीसींसाठी वेगळे मंत्रालय आणणारे आम्ही. ओबीसींसाठी योजना आणणारे आम्ही. महाज्योति तयार करणारे आम्ही. ओबीसींसाठी ४२ हॉस्टेल तयार करणारे आम्ही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ओबीसींचे घालवलेले राजकीय आरक्षण, हे परत आणणारे आम्ही. २७ टक्के पूर्ण ओबीसींचे आरक्षण आणणारे आमचे सरकार आहे. त्यामुळे ओबीसींना हे समजत आहे की, त्यांचे हित पाहणारे कोण आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. 

सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते

यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसींचे हित केले, असा सवाल करत, मी दाव्याने सांगतो की, माझ्याशी खुली चर्चा करावी. ओबीसींसाठी आमच्या सरकारने केलेले काम आणि इतर सरकारने केलेले काम, यावर चर्चा करायला तयार आहे. यांना केवळ राजकारण करता येते. आम्हाला ओबीसी समाजाचे हित पाहायचे आहे. आम्ही ते हित करणारच आहोत. मराठा समाजाचे हित करणार आहोत. सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आरक्षणासाठी राज्यात होत असलेल्या तरुणांच्या आत्महत्या तसेच दोन्ही समाजातील वाढत चाललेली तेढ, यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मला असे वाटते की, जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे, हे समाजापर्यंत पोहोचवणार नाही, तोपर्यंत तेढ कमी होणार नाही. हे स्पष्ट करू इच्छितो की, ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे. विनानोंदी सर्टिफिकेट मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करायची आवश्यकता नाही. जणू काही आरक्षण गेले आहे, अशा प्रकारचे वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो. दुसऱ्या बाजूनेही टोकाचे राजकारण चाललेले आहे. अशा राजकारणाने कोणत्याच समाजाचे भले होऊ शकणार नाही. समाजाचे भले हे समाजापर्यंत वास्तविकता पोहोचवली तरच होऊ शकते. आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: cm devendra fadnavis said whether obc or maratha the government can only do the best for the welfare of the entire community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.