“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 15:23 IST2025-12-13T15:22:39+5:302025-12-13T15:23:58+5:30
CM Devendra Fadnavis Vidhan Parishad News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतील चर्चांची गुणवत्ता अधोरेखित केली.

“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
CM Devendra Fadnavis Vidhan Parishad News: भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून या ऐतिहासिक सभागृहाच्या शंभर वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण कायदे, ठराव व धोरणांचा दस्तऐवज म्हणून संदर्भसमृद्ध द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन विधानपरिषद सभागृहात करण्यात आले. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे” या ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेला हा द्वितीय ग्रंथ लोकशाहीच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचे दस्तऐवजीकरण करणारा ठरणार आहे. भविष्यातील लोकप्रतिनिधी, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ प्रेरणादायी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विधानपरिषद म्हणजे गुणवत्तापूर्ण चर्चांचे व्यासपीठ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतील चर्चांची गुणवत्ता अधोरेखित केली. सरकार आणि विरोधकांमधील तीव्र वादविवाद असूनही सभागृहाबाहेर सौहार्द टिकून राहणे ही महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेची खासियत असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला सातत्याने सजग ठेवले, याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. विधानपरिषदेत झालेल्या चर्चांमुळे अनेक परिवर्तनकारी कायदे आकारास आल्याचे त्यांनी नमूद केले. हा ग्रंथ लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण संदर्भ ठरेल, असे त्यांनी सांगितले. तसेच कायदा निर्मिती प्रक्रियेत सभागृहांमध्ये होत असलेली चर्चा अत्यंत महत्त्वाची असते. अशा चर्चांमधूनच प्रगल्भ कायद्याची निर्मिती होते. चर्चांमधून निर्मित झालेल्या कायद्यांमध्ये जनमानसाचे प्रतिबिंब दिसून येते. अशा कायद्यांचा निश्चितच लोककल्याणासाठी उपयोग होत असतो, असे फडणवीस यांनी सांगितले.
संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधान परिषद सभागृहाचे सदस्य होते
संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधान परिषद सभागृहाचे सदस्य होते. या सभागृहाने अतिशय हुशार, अनुभवी सदस्य दिले आहेत. त्यांच्या हुशारी, अनुभवाचा लाभ कायदा निर्मिती प्रक्रियेत झाला आहे. या सभागृहाने पारित केलेले कायदे, ध्येयधोरणे यावर आधारित ग्रंथसंपदा निर्माण होत आहे. आपल्या सभागृहातील कामकाजाचे ' रेकॉर्ड ' होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेकॉर्ड नसल्याने अनेक ऐतिहासिक संदर्भाना आपण मुकलो आहोत. पश्चिमात्य देशांमध्ये 'रेकॉर्ड' असल्यामुळे त्यांचे संदर्भ आपणास घ्यावे लागतात. आपली लोकशाही पद्धत त्यांच्यापेक्षा दोन हजार वर्षांनी जुनी आहे, मात्र रेकॉर्ड नसल्याने संदर्भ उपलब्ध होत नाहीत. इतिहास हा संकलित करावयाचा असतो. त्यामुळे सभागृहातील भाषणे, निर्मित कायदे यांचे संकलन करून प्रकाशित केलेला ग्रंथ हा नेहमी ऐतिहासिक दस्ताऐवज ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भाषणात विधानपरिषदेला विचारप्रवर्तक आणि गुणवत्तापूर्ण चर्चांचे वरिष्ठ सभागृह असल्याचे सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन, रोजगार हमी, संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा यांसारख्या महत्त्वपूर्ण कायद्यांमध्ये विधानपरिषदेच्या सूचनांमुळे कायदे अधिक परिणामकारक झाले, असे त्यांनी नमूद केले. शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेला हा ग्रंथ राज्यशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक आणि लोकप्रतिनिधींसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.