“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:40 IST2025-11-15T14:36:55+5:302025-11-15T14:40:35+5:30
CM Devendra Fadnavis Replied Sharad Pawar: पराभव झाल्यानंतर तो स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण करणे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
CM Devendra Fadnavis Replied Sharad Pawar: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोग, भाजपावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही बिहार निवडणूक निकालावरून जोरदार हल्लाबोल केला. परंतु, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसच्या चुका दाखवायला मागे-पुढे पाहिले नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच बिहार निवडणूक निकालावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली. शरद पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
मला एक शंका होती की, बिहारच्या महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला याचा अर्थ आहे की दहा हजार रुपये देण्याची जी योजना आहे त्याचा हा परिणाम असावा. त्याचवेळी मतदान झाले होते. महाराष्ट्रात निवडणुकीच्या आधी पैसे वाटले. मताला पैसे येतात तसे नाही. अधिकृतपणे पैसे वाटले गेले. तसेच बिहारमध्ये झाले. पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जायचे अशी भूमिका घेतली तर एकंदरीत निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल याची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप करणे हे योग्य आहे का, याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. पण दहा दहा हजार रुपये ती लहान रक्कम नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली.
जो जीता वहीं सिकंदर, पराभव स्वीकारता आला पाहिजे
जो जीता वहीं सिकंदर, पराभव झाल्यानंतर तो स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केले पाहिजे. आत्मपरीक्षण करणे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या योजना आहेत, त्या करण्याची संधी सगळ्यांना होती. त्यांचे सरकार असताना त्यांनाही होती. त्यांनी केल्या नाहीत. आम्ही योजना केल्या, त्या लोकांना आवडल्या. लोकांनी आम्हाला मतदान केले. त्यावर लोकांना दोष देण्याचे कारण काय आहे, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
दरम्यान, राहुल गांधी जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाही, तोपर्यंत काही उपयोग नाही. आगामी स्थानिक स्वराज्य पक्षांच्या निवडणुका विरोधी पक्ष एकत्र लढतोय की, वेगवेगळा लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोण काय लढत आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, या ठिकाणी महायुती निवडून येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.