"... तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही"; CM फडणवीसांनी राहुल गांधींना दिला खास सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:25 IST2025-02-07T16:50:18+5:302025-02-07T17:25:10+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

"... तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही"; CM फडणवीसांनी राहुल गांधींना दिला खास सल्ला
CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi Allegations:काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या डेप्युटी स्पीकर हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही प्रश्न उपस्थित केला. निवडणुकीच्या निकालात हेराफेरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काँग्रेसचे नेते राहुल यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारांबाबत आक्षेप घेतला. लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर राहुल गांधी इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत राहुल गांधी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मतदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली असल्याचे म्हटलं.
पराभव होणार असल्याने बोलायची राहुल गांधींकडून प्रॅक्टिस
"मतदार कुठून आले, मतदार याद्यांमधून कुणाची नावे काढली याची सगळी उत्तरे निवडणूक आयोगाने दिली आहेत. त्यामुळे त्याचे वेगळे उत्तर देण्याची काही गरज नाही. राहुल गांधी एक प्रकार कव्हर फायरिंग करत आहेत कारण त्यांनी माहिती आहे की ८ तारखेला दिल्लीच्या निकालानंतर त्यांच्या पक्षाचे दिल्लीतून अस्तित्व गायब होणार आहे. त्यामुळे निकालाच्या दिवशी काय बोलायचं याची प्रॅक्टिस राहुल गांधी करत आहेत. मी नेहमीत सांगितले आहे की, जो पर्यंत राहुल गांधी आत्मचिंतन करणार नाहीत आणि स्वतःच्या मनाला खोट्या गोष्टी सांगून स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न करत राहतील तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही. राहुल गांधींनी स्वतःच्या पराभवाचे आत्मचिंतन करावे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
पत्रकार परिषदेनंतर लगेचच निवडणूक आयोगाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. "निवडणूक आयोग राजकीय पक्षांना प्राधान्य हितधारक मानतो. अर्थात मतदार हा सर्वात महत्त्वाचा असून राजकीय पक्षांकडून येणाऱ्या कल्पना, सूचना आणि प्रश्नांनाही खूप महत्त्व दिले जाते. आयोग संपूर्ण देशात एकसमानपणे स्वीकारलेल्या संपूर्ण तथ्यात्मक आकडेवारीसह लेखी प्रतिसाद देईल," असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.