लोकसभा खासदार राहुल गांधींनी राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात दूध का दूध, पाणी का पाणी झालेच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "भारतासारखी फ्री अँड फेयर निवडणुका कुठेही होत नाही. शरद पवार यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झाल्याचे दिसत आहे", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधींच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावर फडणवीस म्हणाले की, "राहुल गांधींना भेटल्यानंतर इतक्या दिवसांनी शरद पवारांना निवडणूक प्रक्रियेबाबत शंका का वाटू लागली? राहुल गांधी जसे सलीम- जावेदप्रमाणे रोज नवी स्क्रिप्ट तयार करून काल्पनिक कथा मांडतात, तशीच अवस्था शरद पवारांची तर झाली नाही ना? पण ईव्हीएमवर शंका घेणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. शरद पवार यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तरी भारतासारखी फ्री अँड फेयर निवडणुका कुठेही होत नाहीत", असे ते म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?शरद पवार म्हणाले की, "राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत आयोगावर आक्षेप घेतले. त्यावर उत्तर देणे ही आयोगाची जबाबदारी आहे. राहुल गांधींनी प्रश्न विचारले आहेत, मग त्यांना उत्तर मिळावे, अशी अपेक्षा आहे. अशावेळी भाजपने टीका का करावी? असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. शरद पवार पुढे म्हणाले की, एकाच गावात आणि एका घरात एकच व्यक्ती वास्तव्यास असताना तिथे तब्बल ४० लोकांनी मतदान केल्याचे प्रकार समोर आले आहेत. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था असल्याने त्याने या गंभीर आरोपांची गांभीर्याने दखल घ्यावी. या प्रकरणात 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' झाले पाहिजे. राहुल गांधींनी मांडलेली माहिती चुकीची असेल, तर आयोगाने ती स्पष्टपणे फेटाळून लावावी. मात्र, ती माहिती खरी असल्याचे सिद्ध झाले तर, दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी", अशी त्यांनी मागणी केली.