CM Devendra Fadnavis News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत. एकीकडे स्थानिक पातळीवर जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. यातच भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका विधानावरून महायुतीतच मोठ्या प्रमाणावर मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. नितेश राणे यांनी केलेल्या विधानानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत समज दिल्याचे समजते.
राज्यात भाजपाचे सरकार असून, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. पत्रकारांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नितेश राणे यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर, कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी स्वतः याबाबत मला सांगितले की माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावर मी त्यांना सांगितले की, तुमच्या मनात काहीही अर्थ असला तरी राजकारणात लोकांमध्ये त्या वक्तव्याचा काय अर्थ जातो, ते अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने अशा प्रकारे बोलणे योग्य नाही. ही बाबत त्यांनी मान्य केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यासंबंधी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर, ते एकत्रित येणार की नाही? हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या मनात शिरुन ते जाणून घेऊन तुमच्यापुढे ठेवण्याची माझ्याकडे शक्ती नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच जयंत पाटील यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सर्व जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती शरद पवार यांना केली. याबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, जयंत पाटील यांच्या मनात मला शिरावे लागेल. सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त करा म्हणाले, ते जबाबदारीतून मुक्त करणार हे माहिती असल्यामुळे म्हणाले की, त्यांच्या मनात दुसरे काही आहे, हे समजून घ्यावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटात असलेले बंधू निलेश राणे यांनी एक्सवर एक पोस्ट करत नितेश राणे यांना सूचक सल्ला दिला. नितेश ने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे. सभेत बोलणे सोपे आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमका कोणाचा फायदा करतोय याचे भान असले पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले होते.