"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 15:05 IST2025-08-02T14:48:57+5:302025-08-02T15:05:48+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

CM Devendra Fadnavis has responded to Raj Thackeray challenge on the Jan Suraksha act | "...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

CM Devendra Fadnavis on Raj Thackery: महाराष्ट्र विधानसभेने नुकताच जनसुरक्षा कायदा मंजूर केला आहे. काही दुरुस्त्या आणि बदल होऊन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर करण्यात आला. विरोधकांनी या कायद्याला विरोध सुरुच ठेवला आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या कायद्यावरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं. आम्हाला फक्त अटक करून दाखवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्बन नक्षलसारखे वागाल, तर तुम्हालाही अटक होईल, असं म्हटलं.

शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी रायगडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी भाषणामध्ये राज ठाकरेंनी जनसुरक्षा कायद्यावरुन सरकारवर निशाणा साधला. आम्हाला अर्बन नक्षल म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःची पात्रता तपासावी. आम्हाला फक्त अटक करून दाखवा, असं आव्हान राज ठाकरेंनी सरकारला दिलं. त्यावर नागपुरात माध्यमांशी बोलताना अशा प्रकारची वक्तवे ही कायदा न वाचता केलेली आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

"हा कायदा त्यांच्याकरता बनलेला नाही. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाहीत त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही. जे लोक कायद्याच्या विरोधात वागतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात हा कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलायची पूर्ण मुभा आहे. त्यासाठी हा कायदा नाही. अशा प्रकारची वक्तव्यं ही कायदा न वाचता केलेली आहेत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी आग्रही असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. त्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. माझं अतिशय पक्कं मत आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीत सोबत अजून एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात काय वावगं आहे. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या या मानसिकतेला माझा विरोध आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे?

"बाहेरून येऊन जमिनी विकत घेणार आणि वाटेल तसं थैमान घालणार हे चालणार नाही. आता सरकारने कायदा आणला आहे जो आंदोलन करेल तो अर्बन नक्षल. एखाद्या प्रकल्पाला तुम्ही विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते. अटक करूनच पाहा, मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसांना त्यात सामावून घ्यावे लागेल," असं राज ठाकरे म्हणाले. 

Web Title: CM Devendra Fadnavis has responded to Raj Thackeray challenge on the Jan Suraksha act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.