सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:17 IST2025-12-19T15:13:52+5:302025-12-19T15:17:12+5:30
CM Devendra Fadnavis PC News: सातारा प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या बंधूंवर आरोप करण्यात येत आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
CM Devendra Fadnavis PC News: सातारा ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणानंतर राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहेत. गुन्हे शाखेने गावच्या सरपंचासह संबंधित हॉटेलबाबत खुलासा केला असून आतापर्यंतच्या तपासात दरेगावचे सरपंच रणजित शिंदे यांचा संबंध निदर्शनास आलेला नाही. या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर विरोधकांनी मोठे आरोप केले आहेत. या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
सावरी गावातील एमडी बनविण्याच्या कारखान्यावर कारवाई करताना ओंकार तुकाराम डिगे याचा उल्लेख होता. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न न झाल्याने अटक केली नाही. कामगारांकडे फक्त सहा हजार रुपये सापडले, असे सांगितले जात आहे. राजकीय द्वेषातून आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचा दावा ठाण्यातील माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी केला. तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही. जिथे छापा पडला ती जमीन आपल्या जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर लांब आहे, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
आम्ही याप्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत
साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला, त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांचे नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, अयोग्य आहे, निषेर्धाह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरावन्याने आढळून आलेला नाही. आम्ही याप्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतही देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.