“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:53 IST2026-04-12T13:51:41+5:302026-04-12T13:53:33+5:30

CM Devendra Fadnavis Reaction On Asha Bhosale Sad Demise: आशाताईंसारख्या सुविख्यात जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या आमच्या गायिका आमच्यातून निघून गेल्या. मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

cm devendra fadnavis first reaction on asha bhosle sad demise and paid tribute | “मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली

“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली

CM Devendra Fadnavis Reaction On Asha Bhosale Sad Demise: तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या दुःखद निधनाबाबत शोक व्यक्त केला. 

आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह २० भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये १२,००० वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. 

मंगेशकर कुटुंबीयांतील दुसरा तारा आशा भोसले यांचे दुःखद निधन

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अत्यंत दुःखद प्रसंग आहे. मंगेशकर कुटुंबीयांतील दुसरा तारा आशा भोसले यांचे दुःखद निधन झाले. ९२ वर्षे त्या जगल्या, त्यातील बहुतांश काळ अगदी वयाच्या ५-६ वर्षांपासून ते अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली. या देशात सर्वांत व्हर्सेटाइल गायिका म्हणून कोणाकडे पाहायचे असेल, तर त्या आशाताई होत्या. आशाताईंनी शास्त्रीय संगीत तसेच आधुनिक काळातील संगीतही लिलया पेलले. संगीतात जेवढे प्रकार आहेत, शास्त्रीय संगीत असो, पॉप असो, रॉक असो, भावगीत असो, २० पेक्षा जास्त भाषांमध्ये आशाताईंनी गीत गायन केले. 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही मी गायला लावू शकते

जगातील एक वेगळे उदाहरण होते की, ९० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ३ तास कार्यक्रम करणाऱ्या आशाताई होत्या. आम्ही त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, त्यावेळी त्यांच्या जीवनाचा प्रवास सांगितला. किती खडतर आयुष्य जगत त्या इथपर्यंत पोहोचल्या. हे खरोखर अत्यंत प्रेरणादायी होते. मला आठवते की, आम्ही व्हिडिओ जॉकीचा जो कार्यक्रम घेतला होता, त्यात आशाताईंनी मला दोन ओळी गुणगुणायला लावल्या आणि म्हणाल्या की, माझी शक्ती बघा की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही मी गायला लावू शकते, अशी आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली.

दरम्यान, अतिशय जिंदादिल व्यक्तिमत्व आशाताईंचे होते. कोणत्याही कार्यक्रमाच्या प्राण त्या असायच्या. सतत आशाताई हसतमुख, उत्साही असायच्या. ९२ व्या वर्षीही त्यांना उत्साह दांडगा होता. आम्हाला पूर्ण खात्री होती की, लतादीदींचा १०० वा वाढदिवस साजरा करू शकलो नाही, पण आशाताईंचा १०० वा वाढदिवस नक्की करू शकू. दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही. आशाताईंसारख्या सुविख्यात जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या आमच्या गायिका आमच्यातून निघून गेल्या. मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सगळे सामील आहोत. त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून, ते ठरवतील त्याप्रमाणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. संगीताकरिता दिवस अत्यंत दुःखद आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Web Title : मंगेशकर परिवार की महान गायिका आशा भोसले का निधन; फडणवीस ने दी श्रद्धांजलि

Web Summary : मंगेशकर परिवार की महान गायिका आशा भोसले का निधन हो गया है। मुख्यमंत्री फडणवीस ने गहरा दुख व्यक्त करते हुए उनकी गायन प्रतिभा और संगीत में योगदान को याद किया। उन्होंने उनके जीवंत व्यक्तित्व और संगीत के प्रति समर्पण को सराहा।

Web Title : Asha Bhosle, Legendary Singer, Passes Away; Fadnavis Offers Condolences

Web Summary : Asha Bhosle, the iconic singer from the Mangeshkar family, has passed away. CM Fadnavis expressed deep sorrow, highlighting her versatility across genres and languages. He recalled her lively personality and significant contributions to music, noting the void her absence leaves.