एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:56 IST2025-10-14T13:51:00+5:302025-10-14T13:56:49+5:30
CM Devendra Fadnavis News: योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
CM Devendra Fadnavis News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहेत. महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचा दावा विरोधकांकडून अनेकदा केला जातो. यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना आता बंद होत असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे, निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू. सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. आमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील.. शिंदेंच्या या योजना बंद..., असे सांगत अंबादास दानवे यांनी योजनांची यादीच दिली.
CM देवेंद्र फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना योजना बंद होण्याच्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक चांगले ट्विट करण्याची इच्छा झाली, हे महत्त्वाचे आहे. पण, त्यांच्यासहित मी सर्वांना सांगतो की, कोणत्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही. सगळ्या योजना आम्ही चालवणार आहोत. कोणतीच योजना बंद करणार नाही. एखाद्या दुसऱ्या योजनेत काही काळाकरिता काही बदल होऊ शकतात. कारण या संकटामुळे आमच्यावर मोठा भार पडलेला आहे. पण सध्याच्या घडीला कोणत्या योजनेत आम्ही बदलही केलेला नाही. त्यामुळे मला असे वाटत नाही की, कोणती योजना बंद होईल. आमच्या महत्त्वाकांक्षी ज्या योजना आहेत, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी वीजमाफी योजना असेल, यातील कोणतीच योजना बंद होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आनंदाचा शिधा योजनेसाठी सरकारकडे पैसे नसून, ही योजना बंद होण्याची चर्चा सुरू आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. काही योजना चालू असतात, सगळ्याच कायम चालतात, असे नाही. त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल केले जातात. आता आनंदाचा शिधा ठराविक लोकांना मिळायचा. लाडकी बहीण योजनेचे पैसे जास्त लोकांना मिळतात. सगळ्या योजनांबाबत महायुती सरकार सकारात्मक आहे, असे ते म्हणाले होते.