'गोरेंविरोधात कट रचणारे शरद पवार गटाच्या संपर्कात'; CM फडणवीसांनी दोन मोठ्या नेत्यांचं घेतलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:53 IST2025-03-25T13:23:20+5:302025-03-25T13:53:43+5:30

मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात रचण्यात आलेल्या कटाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

CM Devendra Fadnavis alleged that a conspiracy was hatched to deceive Minister Jayakumar Gore | 'गोरेंविरोधात कट रचणारे शरद पवार गटाच्या संपर्कात'; CM फडणवीसांनी दोन मोठ्या नेत्यांचं घेतलं नाव

'गोरेंविरोधात कट रचणारे शरद पवार गटाच्या संपर्कात'; CM फडणवीसांनी दोन मोठ्या नेत्यांचं घेतलं नाव

CM Devendra Fadnavis: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. त्या प्रकरणात कोर्टाकडून गोरे यांना दिलासा देखील मिळाला होता. मात्र त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटकेची कारवाई केली. खंडणी घेताना पोलिसांनी महिलेला अटक केली होती. या प्रकरणात एका युट्यूबवरील पत्रकाराला देखील अटक करण्यात आली. या सगळ्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांचा उल्लेख केला आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातून ही अटक करण्यात आली आहे. महिलेला १ कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. प्रकरण मिटवण्यासाठी महिलेने गोरेंकडे ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर एक कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी महिलेला अटक केली. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची माहिती दिली. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचाही उल्लेख केला.

"मला अडवायला रोज काळ्या बाहुल्या रोवतंय"; जयकुमार गोरेंनी सुनावलं, म्हणाले, "देवाभाऊ..."

"कोणाला जीवनातून उठवायचं राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. जयकुमार गोरे यांच्यासंदर्भातील केस २०१६ मध्ये दाखल झाली आणि ती २०१९ ला संपली. तेव्हा ते आमच्या सोबतही नव्हते. त्यानंतर हे प्रकरण अचानक उकरून काढण्यात आले. मी त्यांच्या हिम्मतीची दाद देतो. कारण अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती आपण दोषी आहोत की नाही याचा विचार न करता घरच्यांचा अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्यासाठी प्रयत्न करतो. पण त्यांच्याकडे लाचेची मागणी झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की. मी या प्रकरणात दोषी नाही, कोर्टाने मला सोडलं आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यावेळी सगळं संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं. त्यानंतर सापळा रचून पैसे घेताना आरोपीला अटक करण्यात आली. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी पुराव्यानिशी सांगतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"जयकुमार गोरेंसंदर्भात तक्रारी करण्यात आल्या. आरोप करणारी महिला, तुषार खरात नावाचा कथित युट्युबवर आणि काही लोकांचं नेक्सस यामध्ये पाहायला मिळालं. पहिली तक्रार जयकुमार गोरे यांनी केली होती. दुसरी तक्रार विराज शिंदे यांनी केली. तिसरी तक्रार उमेश मोहिते यांनी केली. या प्रकरणात जी महिला आहे ती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे अशा प्रकारचा खोटा प्रचार करण्यात आला. त्या विरोधात ही तक्रार होती. या प्रकरणातील लोकांना अटक झाली आहे. यामध्ये ती महिला, तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांचा समावेश आहे. या सगळ्यांनी मिळून जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यामध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक यांच्याशी थेट संपर्कात होते. हे मी पुराव्यानिशी सांगतो. प्रभाकरराव देशमुख हे या तिन्ही आरोपींशी १०० वेळा बोलले आहेत. तुषार खरात यांनी जयकुमार गोरेंविरोधात तयार केलेले व्हिडिओ सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Web Title: CM Devendra Fadnavis alleged that a conspiracy was hatched to deceive Minister Jayakumar Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.