CM देवेंद्र फडणवीसांचा ७ कलमी कृती कार्यक्रम; सर्व सरकारी अधिकाऱ्यांना दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:49 IST2025-01-07T15:42:18+5:302025-01-07T15:49:06+5:30

७ कलमी कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांनी दिला भर, शासकीय अधिकाऱ्यांना दिले निर्देश

CM Devendra Fadnavis 7-point action program; Orders given to all government officials | CM देवेंद्र फडणवीसांचा ७ कलमी कृती कार्यक्रम; सर्व सरकारी अधिकाऱ्यांना दिले आदेश

CM देवेंद्र फडणवीसांचा ७ कलमी कृती कार्यक्रम; सर्व सरकारी अधिकाऱ्यांना दिले आदेश

मुंबई - सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्‍यांनी दिलेल्या सूचनांवर पुढे काय झाले याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत असे आदेश त्यांनी दिले. 

त्याशिवाय शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (Ease of Living) व्हावे यासाठी घेता किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा अशा सूचनाही फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

दरम्यान, मंत्रालयात होणाऱ्या लोकांच्या गर्दीचा उल्लेख करत मुख्यमंत्र्‍यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले. नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत पण असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत. राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

७ कलमी कार्यक्रमावर दिला भर

विभाग, कार्यालयाचे वेबसाईट अद्ययावत करा

ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करा

शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहिम राबवा

नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा 

उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या

शासनाच्या महत्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्याव्यात 

शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या

Web Title: CM Devendra Fadnavis 7-point action program; Orders given to all government officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.