उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 06:24 IST2025-08-07T06:24:30+5:302025-08-07T06:24:42+5:30

पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे...

Cloudburst in Uttarakhand 51 tourists from Maharashtra safe | उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित

उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित

मुंबई : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक या भागात अडकले होते. त्यात नांदेड जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी राज्य सरकारकडून संपर्क साधला जात आहे. पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंडचे सचिव दिलीप जवळकर, पोलिस महानिरीक्षक नीलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे हीच प्राथमिकता आहे, असे ते म्हणाले. 

मालेगावचे सात यात्रेकरू संपर्काबाहेर -
उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर यात्रेसाठी गेलेल्या शहरातील सात जणांचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाइकांच्या चिंता वाढल्या आहेत. राज्य व केंद्र सरकारने त्यांचा शोध घेत सर्वांना सुखरूप परत आणावे, अशी मागणी त्यांच्या परिवाराने केली आहे.  छत्रपती संभाजीनगरातून गेलेले १८, सोलापूरचे ४, पुण्यातील २४ आणि जळगावचे २२ भाविक सुखरूप आहेत. 

संपर्कासाठी क्रमांक :  राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र - ९३२११५८७१४३/ ०२२-२२०२७९९०/०२२-२२७९४२२९ राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : 
०१३५-२७१०३३४/८२१८८६७००५

Web Title: Cloudburst in Uttarakhand 51 tourists from Maharashtra safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.