NCP Jayant Patil ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांच्या पदरी मोठा निराशा आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तर अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. या अपयशानंतर आता शरद पवारांचा पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीच्या पहिल्या दिवसी काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. निवडणूक निकालानंतर काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिल्याने कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावरही परिणाम झालेला असू शकतो. त्यातच महत्त्वाचे नेतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक साधत असतील तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होणं अटळ आहे. बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले काही नेतेच तिकडे पुष्पगुच्छ घेऊन गेले, असं म्हणत जयंत पाटील यांनी संबंधितांना सुनावल्याचे कळते.
जयंत पाटलांकडून पक्षांतराच्या चर्चांवरही भाष्य
जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगत असतात. पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी एक मंत्रिपद रिक्त ठेवल्याचे सांगितले जाते. याबाबत सातत्याने होणाऱ्या चर्चांवर जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खुलासा केला. मी कुठेही जाणार नाही, जायचं असतं तर यापूर्वीच गेलो असतो, असं पाटील यांनी म्हटल्याची माहिती आहे. याबाबत 'टीव्ही ९ मराठी'ने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आळस झटकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.