'सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्यालाही लाज वाटली असेल'- चित्रा वाघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 14:49 IST2023-06-08T14:37:22+5:302023-06-08T14:49:12+5:30
मीरा रोडमध्ये प्रेयसीचे तुकडे केल्याची घटना घडली. यावरुन चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

'सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्यालाही लाज वाटली असेल'- चित्रा वाघ
मीरा रोड : दोन दिवसापूर्वी मुंबईतील मरीन लाईन्स येथील महिलांच्या वसतीगृहात एका तरुणीची हत्या झाली, तर आज मुंबईतील मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय प्रियकराने 32 वर्षीय प्रेयसीची हत्या करून लहान लहान तुकडे केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातले. या प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट केले की, ''सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल…किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो. तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत...मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेंव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं...''
''श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही 35 तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच ! मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही, कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही, मोठ्या ताई…" अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्लाही सुळे यांनी फडणवीसांना दिला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे, अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
नेमकं काय प्रकरण?
भाईंदर पूर्वेला उड्डाणपुलाखाली गीता आकाश दीप इमारतीत मनोज साने (56) आणि सरस्वती वैद्य (32) हे दोघे तीन वर्षांपासून भाड्याने राहत होते. या सदनिकेतून दुर्गंधी येऊ लागल्याने तसेच संशयास्पद हालचालींमुळे रहिवाशांनी बुधवारी रात्री नयानगर पोलिसांना कळवले. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी लिफ्टमधून पळून चाललेल्या साने याला पकडले. फ्लॅटचा दरवाजा उघडला असता मानवी शरीराचे असंख्य तुकडे दिसले.
पोलिस उपायुक्त जयंत बजबळे हेही घटनास्थळी होते. साने याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार, 4 जूनला साने याने सरस्वतीची हत्या करून तिचे कटरने तुकडे केले. तिचा मृतदेह नष्ट करण्यासाठी त्याने काही तुकडे शिजवून ते भटक्या कुत्र्यांना खायला घातल्याचे सांगितले जात आहे. पोलिस त्याबाबत चौकशी करत आहेत. त्याने कोणत्या कारणाने व कशा प्रकारे हत्या केली? याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले.