शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

मातृभाषेतूनच मुलांची जडणघडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 12:55 AM

पल्या या पुरातन भूमीत विविध भाषा आणि संस्कृतींची नित्य जोपासना झालेली आहे.

- एम. व्यंकय्या नायडू

पल्या या पुरातन भूमीत विविध भाषा आणि संस्कृतींची नित्य जोपासना झालेली आहे. गेली अनेक शतके शेकडो भाषा आणि बोलींच्या सहचर्याने भारतभूमीच्या सांस्कृतिक बहुविध आसमंताला चैतन्यमयी बनवले आहे. आपली मातृभाषा म्हणजे केवळ संपर्काचे प्राथमिक साधन नसते तर आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक अस्मितेशी तिचा अतूट असा संबंध असतो, याचा विसर आपणाला पडता कामा नये. म्हणूनच सरकारने मातृभाषेतून अध्ययन व्हावे यासाठी धोरणात्मक निर्णय घेत त्यांची नीट अंमलबजावणी होण्यासाठी सदैव दक्ष राहणे गरजेचे आहे. 

अनेक भाषांना लागलेली उतरती कळा त्यांना काळाच्या उदरात गडप करण्याची शक्यता गृहीत धरून युनेस्कोने १९९९च्या नोव्हेंबर महिन्यात २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून पाळण्यात येईल, असा संकल्प केला. सदस्य राष्ट्रांतील सांस्कृतिक आणि भाषिक बहुविधतेचे रक्षण करणे हा आणखी एक हेतू या निर्णयामागे होता. जगातील अर्ध्याहून अधिक भाषा या शतकाअखेरीस अस्तंगत होतील, असे कठोर भाकितही संयुक्त राष्ट्रसंघाच्या या यंत्रणेने वर्तवले आहे. 

‘शिक्षण आणि सामाजिक जीवनात समावेश करून बहुभाषिकत्वाचे संवर्धन’ ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या आयोजनामागची मध्यवर्ती कल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याच्या तत्त्वाने कार्यरत असलेल्या प्रशासन प्रणालीच्या ‘सब का साथ, सब का विकास’ या संकल्पनेशीही या कल्पनेची नाळ जु‌ळलेली आहे. भारतीयांना या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे वेगळेच अगत्य आहे, कारण सांस्कृतिक आणि भाषिक बहुविधतेच्या चिरेबंदी पायावरच भारतीय संस्कृती उभी आहे.

आपली मूल्ये, आपण पाहिलेली स्वप्ने, आपल्या आशा-अपेक्षा आणि आदर्श, आपले जीवन आणि साहित्य यांची अभिव्यक्ती आपल्या मातृभाषेतून होत असते. आपल्याकडील अनेक भाषांतून आणि त्याहून कितीतरी पटींनी जास्त असलेल्या बोलींतून आपण संकलित केलेले प्राचीन ज्ञान कालौघात नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. याचे प्रमुख कारण आहे आपल्या मातृभाषेला गौण लेखत इंग्रजीकडे उन्नतीचे प्रतीक म्हणून पाहाण्याचा आपला चुकीचा दृष्टिकोन.

आज या विचारप्रवाहाचा दबाव वाढतो आहे. इंग्रजीचे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे काही तरी फार मोठे साध्य करणे, अशा प्रकारची मानसिकता बळावत असल्यामुळे मातृभाषेचा सन्मान करण्याकडील आपला कल विरळ होतो आहे. या मानसिक गुलामगिरीच्या विरोधात मी नेहमीच कठोरपणे भाष्य करत आलो आहे. महात्मा गांधींमधल्या द्रष्ट्या माणसाने आपल्याला यासंदर्भात सावध करताना म्हटले होते, ‘जर इंग्रजीतून शिक्षण घेतलेल्यांनी आपल्या मातृभाषेप्रति अनासक्त राहण्याचे सत्र चालूच ठेवले तर भाषिक दुष्काळाची परिस्थिती आपण स्वत:वर ओढवून घेऊ.’ 

बालकामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी, त्याच्यातील सर्जक प्रतिभेला प्रकाशमान करण्यासाठी आणि त्याच्या आकलनशक्तीला परिपूर्ण बनवण्यासाठी संस्कारक्षम वयात मातृभाषेतून शिक्षण देणेच योग्य ठरते, हे अनेकांच्या अभ्यासाअंती समोर आलेले सत्य. नेल्सन मंडेला यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘जर एखाद्या व्यक्तीला समजणाऱ्या भाषेतून तुम्ही त्याला काही सांगितले तर ते त्याच्या डोक्यात जाईलही, मात्र जर तुम्ही त्याच्याच भाषेत त्याच्याशी बोललात तर ते त्याच्या हृदयाला भिडेल.’ 

‘मातृभाषा’ ही संज्ञाच मुळी एखाद्या व्यक्तीच्या जडणघडणीच्या वातावरणाशी असलेला भाषेचा दृढ संबंध व्यक्त करते. हेच तत्त्व मांडताना युनेस्कोचे माजी महासंचालक कोइचिरो मात्सुरा यांनी सुंदर असे विवेचन केले आहे. ते म्हणतात, ‘आपल्या मातेपासून आपण जी भाषा आत्मसात करतो तीच आपल्या अंतरातील विचारांची मायभूमी असते.’ मात्सुरा यांना जगातली प्रत्येक भाषा ‘मानवी जीवनाइतकीच मौलि

शिक्षणाचे माध्यम केवळ इंग्रजी असले तरच चांगले शिक्षण पदरी पडेल, या साचेबद्ध धारणेपासून आपल्याला विलग करण्याचा यत्न पालकांनी आणि शिक्षकवर्गाने करायला हवा. मुलाच्या जडणघडणीच्या काळात त्यांना दिले जाणारे प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेतूनच दिले जावे, अशी माझी ठाम धारणा आहे. मुलांच्या भाषिक आणि सांस्कृतिक मूलाधारास मजबुती देत त्यांना आत्मविश्वास प्रदान करण्याचा हा काळ असतो. मला असेही वाटते की, तत्पश्चात मुलांना एक देशी आणि एक आंतरराष्ट्रीय भाषा आत्मसात करण्यासाठी प्रेरणा देत पालक व शिक्षकांनी त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करायचा असतो.

जगाच्या अनेक भागांत किमान दोन दोन भाषांचे अध्ययन करत मुले आपले दैनंदिन व्यवहार पार पाडत मोठी होत आहेत. खुद्द आपल्या देशातल्या अनेक राज्यांतही हा बहुभाषिकतेने आणि सांस्कृतिक वैविध्याने विनटलेला अनुभव मिळत असतो. या प्रगत भाषिक कौशल्यामुळे मुलांच्या आकलनशक्तीत सकारात्मक बदल होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मातृभाषेबरोबर अन्य भाषांच्या अभ्यासातून सांस्कृतिक अनुबंध जुळतात आणि नवनव्या अनुभवांचे विश्व मुलांसमोर उलगडते. 

साहित्यिक आणि विद्वत्तायुक्त परंपरा, लोकवेद, म्हणी, सुभाषिते आणि वाक्प्रयोगांचे भांडार प्रत्येक भाषेत असतेच. युनेस्कोचे माजी सदिच्छा राजदूत आणि आइसलँड देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष विग्दिस फिनबोगादोतीर यांनी हाच मुद्दा नेमक्या शब्दांत मांडताना म्हटले आहे, ‘भाषा हा मानवतेचा सर्वांत मौल्यवान आणि त्याचबरोबर सर्वाधिक नाजूक ठेवा आहे.’ 

आपल्या देशात २०१८ साली केलेल्या भाषिक जनगणनेअंती भारतात १९,५०० भाषा आणि बोली वापरात असल्याचे आढळून आले. यातील १२१ भाषांचा वापर नागरिक नियमित करीत असतात. १९६ भाषा नामशेष होण्याकडे मार्गक्रमण करत असून, त्यांच्या जतन, संवर्धनाची नितांत आवश्यकता आहे. 

अनेक क्षेत्रात मातृभाषेतून प्रशासन प्रक्रिया नेण्याची गरज मी नेहमीच व्यक्त करत आलो आहे. जर सामान्य माणसाला कळणाऱ्या भाषेतून प्रशासनाने त्याच्याशी संवाद साधला तरच प्रशासन खऱ्या अर्थाने त्याच्या दारी पोहोचल्याचा अनुभव त्याला मिळेल. विविध क्षेत्रीय आणि राज्यांच्या राजभाषांतून परीक्षा घेण्याचा भारत सरकारच्या विविध खात्यांचा निर्णय म्हणूनच मला स्वागतार्ह वाटतो.

राज्यसभेत सदस्यांना अनुसूचीत समाविष्ट असलेल्या २२ भाषांमधून कोणत्याही भाषेत आपले म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य असते. याच दिशेने पावले टाकत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निवाड्यांचे पहिल्या टप्प्यांत २२ पैकी ६ भाषांतून भाषांतर करण्याचा निर्णय घेतला असून, या बहुभाषिकत्वाकडे झुकणाऱ्या उपक्रमातून न्यायाच्या सार्वत्रिक उपलब्धतेची संकल्पना दृढ होईल. 

प्रत्येक भाषा ही एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवा असते. मूल्ये, प्रथा- परंपरा, लोकानुरीती, लोककथा, लोकाचार आणि जनजीवनाचे भांडार असते. कोणत्याही संस्कृतीशी नाते जोडायचे असेल आणि तिचे सच्चे मूल्यांकन करायचे असेल तर ती भाषा आधी आत्मसात करावी लागते. भाषा आणि संस्कृतींचे सहजीवन सक्षम होण्यास त्यांनी एकमेकीस दिलेला आधार ऐतिहासिक आहे. संस्कृतीचे द्योतक असलेली भाषा ही सामाजिक आणि वांशिक अभिसरणासाठीचा राजमार्ग असते. आपल्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक समाजाच्या अंगप्रत्यंगात मुरलेल्या आणि आपल्या वैयक्तिक, क्षेत्रीय व राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग बनलेल्या अगणित भाषांना सक्षम आणि सचेतन बनवण्यासाठी आपण प्रयत्नरत राहूया.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र