Join us  

मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ मध्ये सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 7:36 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live : मुंबई इंडियन्सलाआयपीएल २०२४ मध्ये सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने उभ्या केलेल्या २५७ धावा तशा फार नव्हत्या, कारण कालच पंजाब किंग्सने २६१ धावांचे लक्ष्य पार करून दाखवले होते. पण, मुंबईला अपेक्षित सुरुवात नाही मिळाली आणि त्यांची मधली फळीही ढेपाळली. मुकेश कुमार,  खलील अहमद व रसिख सलाम ( ३-३६) यांनी चांगली गोलंदाजी करून DC ला सामन्यात फ्रंटसीटवर बसवले.

रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला

इशान किशन व रोहित शर्मा यांच्याकडून MIला आक्रमक उत्तराची अपेक्षा होती. पण, खलील अहमदने चौथ्या षटकात रोहितला ( ८) माघारी पाठवले. रोहित फटका मारायला कुठे गेला अन् चेंडू भलतीकडे उडाला. रोहितने DC विरुद्ध सर्वाधिक १०३३ धावांचा विक्रम नावावर करताना विराट कोहलीचा ( १०३०) विक्रम मोडला. मुकेश कुमारने त्याच्या पहिल्या षटकात अचूक टप्पा टाकून इशानला ( २०) बाद केले. Impact Player सूर्यकुमार यादव ( २०) यालाही खलीलने चतुराईने माघारी पाठवून मुंबईला मोठा धक्का दिला. कर्णधार हार्दिक पांड्यावर भीस्त होती आणि त्याने कुलदीप यादवच्या एका षटकात ४,४,४,६ अशा १९ धाव चोपल्या. हार्दिकने चौथ्या विकेटसाठी तिलक वर्मासह ३९ चेंडूंत ७१ धावा केल्या. हार्दिक चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु इम्पॅक्ट प्लेअर रसिख सलामने दिल्लीला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. हार्दिक २४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावांवर बाद झाला. रसिखने त्याच षटकात नेहाल वढेराला ( ४) बाद करून मुंबईचा निम्मा संघ १४० धावांत तंबूत पाठवला. ३६ चेंडूंत १०६ धावा मुंबईला करायच्या होत्या. तिलकने १५व्या षटकात कुलदीपच्या गोलंदाजीवर २१ धावा चोपल्या. तिलकने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.  रसिखने १७व्या षटकात फक्त ७ धावा देऊन मुंबईवरील दडपण ( १८ चेंडूंत ६४ धावा) वाढवले. टीम डेव्हिडने १८व्या षटकात ६,४,६ खेचले, परंतु मुकेशने गोलंदाजीत बदल केला आणि रिषभही यष्टिंजवळ येऊन उभा राहिला. त्यामुळे टीमवर क्रिजवर राहण्याचे दडपण वाढले अन् चौथ्या चेंडूवर तो पायचीत झाला. टीम १७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांवर बाद झाला आणि तिलकसह त्याची ७० ( २९ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. पण, तिलकने शेवटचा चेंडू सीमापार पाठवला आणि १२ चेंडूंत ४१ असा सामना आणला. रसिखने त्याच्या चौथ्या व डावातील १९व्या षटकात मुंबईच्या मोहम्मद नबीला ( ७) बाद करून सामन्यातील चुरस आणखी वाढवली.

शेवटच्या षटकात २५ धावा मुंबईला करायच्या होत्या आणि तिलक स्ट्राईकवर होता. पहिल्या चेंडूवर दोन धावांच्या प्रयत्नात तिलक रन आऊट झाला. तो ३२ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावांवर बाद झाला. मुंबईला ९ बाद २४७ धावा करता आल्या आणि दिल्लीने १० धावांनी सामना जिंकला.

तत्पूर्वी, २२ वर्षाच्या Jake Fraser-McGurk ने २७ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांसह ८४ धावा कुटल्या आणि अभिषेक पोरेलसह ( ३६) पहिल्या विकेटसाठी ७.३ षटकांत ११४ धावा फलकावर चढवल्या. शे होप ( ४१) व रिषभ पंत ( २९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी २४ चेंडूंत ५४ धावा जोडल्या. रिषभ व त्रिस्तान स्तब्स जोडीने २७ चेंडूंत ५५ धावांची फटकेबाजी केली. स्तब्सने २५ चेंडूंत  ६ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा करून संघाला ४ बाद २५७ धावांवर पोहोचवले. दिल्लीच्या या आयपीएलमधील सर्वोच्च धावा ठरल्या. यापूर्वी २०११ मध्ये पंजाबविरुद्ध ४ बाद २३१ धावा केल्या होत्या.  

IPL 2024 Point Tableमुंबई इंडियन्सचा ९ सामन्यांतील हा सहावा पराभव ठरला आणि ते अजूनही ६ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सने १० सामन्यांत पाचवा विजय मिळवून १० गुणांसह स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत ठेवले आहे. MI ला प्ले ऑफमध्ये जायचे असल्यास उर्वरित पाचही सामने जिंकावे लागतील. 

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स