वैद्यकीय सुविधांअभावी मुले दगावली
By Admin | Updated: December 28, 2014 01:26 IST2014-12-28T01:26:06+5:302014-12-28T01:26:06+5:30
तेलंगण सीमेलगतच्या आसरअल्ली भागातील एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, जन्मत:च या मुलांना आरोग्य केंद्रात आवश्यक सोयीसुविधा न मिळाल्याने या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला.

वैद्यकीय सुविधांअभावी मुले दगावली
गडचिरोली : तेलंगण सीमेलगतच्या आसरअल्ली भागातील एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, जन्मत:च या मुलांना आरोग्य केंद्रात आवश्यक सोयीसुविधा न मिळाल्याने या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला. या घटनेला गडचिरोली जिल्हा आरोग्य प्रशासन व राज्य शासनाची टोल फ्री आरोग्य सेवा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आह़े
गडचिरोली या मागास जिल्ह्यात राज्य शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेशिवाय अन्य आरोग्य सेवा नाही. ४५ आरोग्य केंद्रे, ३ उपजिल्हा रुग्णालये, ८ ग्रामीण रुग्णालये व १ जिल्हा सामान्य रुग्णालय या भरवशावर आरोग्य यंत्रणेचा कारभार सुरू आहे. आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर एमबीबीएस व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गावपातळीवरील आरोग्य उपकेंद्रातून रुग्णांना ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. तेथून रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले जातात. असाच प्रकार सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावातील सारक्का गगुरी या महिलेबाबतही घडला. गगुरी यांना आसरअल्ली येथील उपकेंद्रात जुळी मुले झाली. परंतु या मुलांचे वजन कमी तसेच त्यांची स्थिती नाजूक असल्याने त्यांना आसरअल्लीवरून सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या रुग्णालयाने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी सांगितले. अहेरीला येताना या महिलेचा एक शिशू १०० कि.मी.च्या प्रवासात दगावला. अहेरीवरून पुन्हा गडचिरोली येथे या महिलेला एका नवजात शिशूला घेऊन पाठविण्यात आले. गडचिरोली या जिल्हा रुग्णालयानेही त्या नवजात शिशंूवर आवश्यक उपचार करण्याची गरज होती. परंतु त्यांनीही नागपूर येथे जाण्याचा सल्ला दिला.
आसरअल्ली ते नागपूरपर्यंतचा ४०० कि.मी.चा प्रवास करताना सारक्का गगुरी यांना आपला दुसराही शिशू गमवावा लागला. नागपूर येथे दुसऱ्याही नवजात शिशूचा मृत्यू झाला.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक आरोग्य केंद्रांना नवजात शिशू बाळ कक्ष (वॉर्मर) पुरवठा करण्यात आले आहे. मात्र ते हाताळण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना नाही. अनेक रुग्णालयांत बाळंतपणाच्या केसेस हाताळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नाहीत. केवळ ‘रेफर टू रेफर’ असा कार्यक्रम गावापासून जिल्ह्यापर्यंत सुरू आहे. त्यामुळेच सारक्कांना आपले जुळे अपत्य गमवावे लागले. (प्रतिनिधी)
च्राज्य शासन प्रसूत महिलांना विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध करून देते. मात्र सिरोंचा रुग्णालयात या सेवेसाठी डॉक्टर व वाहनचालक नाही. त्यामुळे २ महिन्यांपासून ही रुग्णसेवा बंद आहे. त्यामुळे अहेरीला येताना या महिलेचा एक शिशू १०० कि.मी.च्या प्रवासात दगावला. अहेरीवरून पुन्हा गडचिरोली येथे एका नवजात शिशूला घेऊन पाठविण्यात आले.