झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 06:16 IST2025-12-14T06:16:23+5:302025-12-14T06:16:59+5:30
अनेक गुन्ह्यांना वाचा फुटत नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण

झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
मुंबई : एकीकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना ताज्या असतानाच दुसरीकडे गोवंडी, मानखुर्दसह मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये गेल्या काही वर्षांत नवजात बालकांना विकणाऱ्या टोळ्या डोके वर काढत असल्याचे पोलिसांच्या कारवायांतून समोर येत आहे. पालकांच्या स्वेच्छेने घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांना वाचा फुटत नाही, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
या टोळ्यांचे सदस्य येथील खासगी, शासकीय प्रसूतिगृहांतून, वस्त्यांतून गरोदर महिलांची, त्यांच्या आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीची इत्यंभूत माहिती काढतात. त्यांच्या कुटुंबीयांना गाठून मूल विक्री आणि त्यातून होणारा आर्थिक फायदा त्यांच्या गळी उतरवतात. संघटित टोळ्या अपत्य न होणाऱ्या दाम्पत्यांची माहिती आयव्हीएफ केंद्रांमधून मिळवतात आणि दोन्ही बाजूंच्या लोकांना विश्वासात घेऊन सौदा करत असल्याचे कारवाईतून उघड झाले आहे.
पोलिसांकडून बेपत्ता मुलांच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या माध्यमातून हजारो मुलांची कुटुंबीयांसोबत हरवलेली नाळ पुन्हा जुळवण्यात यश आले आहे. हरवलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी पोलिसांचे स्वतंत्र मिसिंग पथक काम करते. यामध्ये विशेषतः लहान मुलांच्या शोधासाठी पथकाची धडपड सुरू असते. आतापर्यंत अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा उलगडा करीत पोलिसांनी चिमुकल्यांचा शोध घेतला आहे, तसेच लहान मुलांसाठी १०९८ ही हेल्पलाइन २४ तास सुरू आहे.
श्रमिकांच्या वस्तीत होताहेत सौदे
झोपडपट्टी तसेच दाट लोकवस्तीच्या भागात ९९ टक्के नागरिकांचे हातावर पोट आहे. उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्यांतून स्थलांतरित श्रमिकांच्या या वस्तीत कोणाला मूल नको असते, तर कोणाला ते विकून आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी आशा असते. ही मानसिकता हेरून नवजात बालके लाखो रुपयांना विकणाऱ्या अनेक टोळ्या या भागात सक्रिय आहेत. पोलिसांकडून अशा टोळ्यांवर लक्ष असून, शोध सुरू आहे.
बदनामीची भीती अन् आर्थिक हातभार
नुकत्याच झालेल्या कारवाईत २० वर्षीय अविवाहित तरुणी प्रेमसंबंधातून गरोदर राहिली होती. तिला हे मूल नको होते. तिला पैसेही नको होते. फक्त बदनामीच्या भीतीने या सर्व प्रकरणातून बाहेर पडायचे होते. गोवंडीच्या रॉयल हॉस्पिटलमध्ये डॉ. कयामुद्दीन खान यांनी तिची यशस्वी प्रसूती केली. विशेष म्हणजे प्रसूती करण्याआधी व नंतर बंधनकारक असलेल्या कुठल्याच नोंदी त्यांनी केल्या नाही. त्यावरून डॉ. खान यांनी मूल विक्रीच्या उद्देशाने आधीच कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. या तरुणीची परिस्थिती माहीत असल्याने त्यांनी परस्पर प्रसूती करून ते बाळ पाच लाखांत विक्रीस काढले. या प्रकरणात डॉ. खान आणि परिचारिका अनिता सावंत यांना अटक करण्यात आली असून, अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. तर पहिल्या प्रकरणात दाम्पत्याला तीन मुले होती. त्यावर चौथे झाले. हे मूल विकून आर्थिक परिस्थितीत हातभार लागेल म्हणून स्वतःहून मुलाला विकले.
मुलांच्या अपहरणाकडे सरकारचे लक्ष नाही का? - राज ठाकरे यांचा सवाल
महाराष्ट्रातील लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. लहान मुले, तरुण मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे. याकडे सरकारचे लक्ष नाही का?, सरकार नक्की काय कारवाई करत आहे?, असे सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी पत्रातून केले आहेत.
लहान मुले, तरुण मुली व महाराष्ट्रातील जमिनीही पळवल्या जात आहेत. विधिमंडळात यावर चर्चा होऊन एकमुखाने प्रशासनाला काही पाऊले उचलण्यास भाग पाडावे, असे सत्ताधारी व विरोधी पक्षांनाही वाटत नाही. सभागृहात उत्तरे देण्यास मंत्रीच नसल्याने या विषयावर चर्चा होण्याची अपेक्षा अवाजवी ठरेल. चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावून पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याइतकेच अधिवेशनाचे प्रयोजन आहे का? असे सवाल करतानाच मुख्यमंत्री म्हणून यात लक्ष घालून अधिवेशनात चर्चा घडवून आणण्याची मागणीही राज यांनी केली आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२१ ते २०२४ या कालावधीत अपहरणाचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांनी वाढले आहे. पालकांनी नोंदवलेल्या तक्रारींची ही आकडेवारी असली, तरी हजारो तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत नाहीत. मुलांना पळवून नेणारी टोळी राज्यात कार्यरत होऊन राजरोसपणे काम कशी करते? रस्ते, रेल्वे स्टेशन, बसस्टँडवर भीक मागणाऱ्या मुलांसोबत असणारे त्यांचे आई-वडील खरे आहेत का? इत्यादी गोष्टींचा तपास करावा. वेळ पडल्यास त्यांची डीएनए टेस्ट करावी. असे आदेश द्यावेसे सरकारला का वाटत नाही? अशीही विचारणा राज यांनी केली.
आकडेवारी मोठी असली तरी परिस्थिती वेगळी : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एखादी मुलगी घरात भांडून निघून गेली आणि पुन्हा तीन-चार दिवसांनी परत आली, तरी तिची बेपत्ता होण्याची तक्रार दाखलच असते. वर्षभरात २० टक्क्यांपर्यंत मुली परत आणतो किंवा त्याच घरी परत येतात. पुढील वर्षात आणखी काही मुली सापडतात किंवा घरी येतात. त्यामुळे ही आकडेवारी मोठी दिसत असली, तरी परिस्थिती तशी नाही. यापूर्वीही बेपत्ता मुलींच्या संदर्भातील कारणे आकडेवारीसह दिली आहेत. राज यांच्या काही शंका असल्यास त्यांना नक्की उत्तर देईन.