"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:01 IST2025-12-22T15:36:11+5:302025-12-22T16:01:53+5:30

चंद्रपूरच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारल्याने मुनगंटीवार प्रचंड आक्रमक झाले आहेत.

Chief Ministership Isnt Permanent Sudhir Mungantiwar Sharp Jibe at BJP Leadership After Chandrapur Defeat | "ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले

"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले

Sudhir Mungantiwar: राज्यात भाजपने नगरपरिषद निवडणुकीत मोठे यश मिळवले असले तरी, चंद्रपूरमधील निकालाने पक्षांतर्गत वादाला तोंड फोडले आहे. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारल्याने मुनगंटीवार प्रचंड आक्रमक झाले आहेत. दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम असल्याचा म्हणत भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपद असो वा मंत्रिपद, काहीच शाश्वत नसतं, अशा शब्दांत त्यांनी थेट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपला रोख वळवला आहे.

चंद्रपुरात भाजपची पीछेहाट, काँग्रेसचे वर्चस्व

विदर्भात भाजपने १०० पैकी ५५ जागा जिंकल्या असल्या, तरी चंद्रपूरमध्ये चित्र पूर्णपणे उलट आहे. जिल्ह्यातील ११ पैकी तब्बल ८ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला असून, भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. खुद्द मुनगंटीवारांच्या जिल्ह्यात झालेला हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असून, याचे खापर त्यांनी पक्षाच्या धोरणांवर फोडले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांची नाराजी दूर करत भाजपच्या इनकमिंग धोरणावर भाष्य केलं होतं. 

निकालांनंतर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांनी अतिशय परखड भूमिका मांडली. मंत्रिपदाच्या वाटपावरून आणि पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेवरून त्यांची 'खदखद' या वक्तव्यातून स्पष्टपणे दिसून आली. त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्रीपद येतं आणि जातं असं म्हणत आपण नाराज नसल्याचे सांगितले.

बावनकुळेंना प्रत्युत्तर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी "मंत्रिपद नसण्याचा आणि पराभवाचा थेट संबंध नसतो" असे म्हणत मुनगंटीवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुनगंटीवारांनी त्यांनाही चोख प्रत्युत्तर दिले. "बावनकुळे साहेबांना आता असं वाटणं सहाजिक आहे, पण मध्यंतरी जेव्हा त्यांची शक्ती कमी करण्यात आली होती, तेव्हा मात्र त्यांनाही असंच वाटत होतं," अशी बोचरी टीका केली.

"मुख्यमंत्रीपदही येतं आणि जातं..."

"मी कधीच नाराज असत नाही, माझ्या आयुष्यात भगवान महादेवाने मला नाराज न होण्याची शक्ती दिली आहे. पण योग्य क्षणी योग्य सल्ला देण्याची  जबाबदारी या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून माझी आहे. कार्यकर्ते माझ्यापर्यंत जे भूमिका पोहोचवतात ते सांगण्याची माझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी मी व्यवस्थितपणे वठवतो. मला मंत्रिपद न दिल्याची नाराजी नाही पण ती जनतेमध्ये आहे. मंत्रिपद येतं आणि जातं. मुख्यमंत्री पदही ज्यांचे आहे त्यांचे येणार आहे जाणारही आहे. पर्मनन्ट कोणी नाहीये. शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही मंत्री नाही, आमदार, खासदार नाही किंवा मुख्यमंत्री नाही," असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.
 

Web Title: Chief Ministership Isnt Permanent Sudhir Mungantiwar Sharp Jibe at BJP Leadership After Chandrapur Defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.