CM Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना पाठदुखी-मानदुखीचा त्रास; चाचण्यांनंतर मुख्यमंत्री 'ऑन ड्युटी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 22:39 IST2021-11-08T22:37:42+5:302021-11-08T22:39:22+5:30
CM Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेला पट्टा असल्याचं दिसलं होतं.

CM Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना पाठदुखी-मानदुखीचा त्रास; चाचण्यांनंतर मुख्यमंत्री 'ऑन ड्युटी'
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील ऑनलाइन पद्धतीनं उपस्थित होते. परंतु यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मानेला पट्टा असल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, त्यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होत असल्याची माहिती यानंतर समोर आली होती.
दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल होऊ शकतात असं वृत्त समोर आलं होतं. याप्रकरणी लोकमतनं मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून यावेळी देण्यात आली. तसंच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचं वृत्तही फेटाळण्यात आलं.
नुकतेच त्यांच्या मानेच्या स्नायूच्या दुखापती आणि पाठदुखीमुळे काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. परंतु त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेदेखील उपस्थित होते.