मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 15:35 IST2022-07-11T15:34:26+5:302022-07-11T15:35:16+5:30
Eknath Shinde : मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
मुंबई : राज्यात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई आणि उपनगरांतही पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. याचबरोबर, गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. पुढील २ दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. चार वाजता एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, सर्व प्रकारची दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही नदी-नाल्यांना पूर आला असून ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा स्थितीत कामानिमित्त निघालेले नागरिक पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडू शकते. सोमवार ते बुधवारपर्यंत हवामान खात्याने गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे परिस्थती आणखी बिघडू शकते.
३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
- नदीच्या काठी व सखल भागात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. या कुटुंबांची व्यवस्था प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये केली आहे.
- अहेरी तालुक्यातील सूर्यापल्ली येथील १६, गाेलाकर्जी ४०, तिमरम ४, माेदुमगडगू ४, निमलगुडम १२, रेगुलवाही १५, मरमपल्ली ४०, लिंगमपल्ली १२०, कमलापूर ३१, छल्लेवाडा ७१ जणांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच सिराेंचा तालुक्यातील मद्दीकुंठा ३२ व सूर्यारावपल्ली येथील ४० नागरिक असे एकूण ३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.