'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 14:28 IST2025-04-25T14:25:57+5:302025-04-25T14:28:06+5:30
Devendra Fadnavis on Raj Uddhav Alliance: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या विषयाभोवती चर्चेचा धुरळा उडत आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीही झाल्या. या दोन्ही कुटुंबांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले?

'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
Devendra Fadnavis Maharashtra News: राज ठाकरेंनी साद दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. शरद पवार आणि अजित पवार बैठकीच्या निमित्ताने भेटताना दिसले आणि राज्यात पुन्हा चर्चांना उधाण आले. ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या विधानांचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. याच सगळ्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'एनडीटीव्ही मराठी'च्या कार्यक्रमात मुलाखत झाली. यावेळी त्यांना ठाकरे बंधू आणि पवार काका-पुतण्या यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
वाचा >>'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
राज्यात पुन्हा काही राजकीय आघाड्या होताना तुम्हाला दिसत आहेत का? कारण दोन-तीन दिवसांपूर्वी आपण बघितलं की, राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. पुण्यात शरद पवार-अजित पवार भेटले. हे राजकीय आघाडी होतंय तुम्हाला दिसत आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.
'...तर आम्हाला त्याची अडचण नाही'
प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "माझी पहिली भूमिका कुठलेही परिवार एक होत असतील, तर आम्हाला त्याची अडचण नाही. त्यांनी जरूर एकत्रित यावं. आम्ही त्यांच्या एकत्रित येण्याचं स्वागत करू."
एकत्र येण्याची कुठलीही परिस्थिती दिसत नाही -फडणवीस
"दुसरं, माध्यमे फार जास्त ऐकतात. फार जास्त विचार करतात आणि फार जास्त संदर्भ काढतात. दोन वाक्यांमधील अर्थ काढणं, हे जेवढं तुम्ही करता. मला असं वाटतं की, फार पुढचा विचार तो असतो. आतातरी मी स्पष्टपणे सांगतो. काय जे चाललेलं असेल... आतातरी अशा प्रकारच्या रिअलाईमेंटची मला कुठलीही परिस्थिती दिसत नाही. अर्थात साद आणि प्रतिसाद ज्यांनी दिला, असं तुम्ही म्हणत आहात. ते याबद्दल अधिक सांगू शकतील. मी त्याबद्दल अधिक सांगणं योग्य नाही. त्यामुळे हा मुद्दा तुम्ही त्यांनाच विचारा", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
"तुम्ही एक लक्षात ठेवा, जे तुम्ही करता (अर्थ काढता) ते कधीच होत नाही. एवढा तर तुम्ही अनुभव घ्या २०१९ पासूनचा", असा चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढला.