"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 23:36 IST2025-12-10T23:33:39+5:302025-12-10T23:36:36+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे.

"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या सुधारणांवर संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. निवडणूक आयोग, विद्यापीठे, तपास यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांवर आरएसएसकडून कब्जा केला जात असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'राहुल गांधींच्या वक्तव्यावर बोलायला मी रिकामा नाही,' अशा शब्दांत टीका करत प्रतिक्रिया दिली आहे.
आरएसएस प्रोजेक्ट अंतर्गत संस्थांवर कब्जा
राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत दावा केला की, आरएसएसच्या प्रकल्पांतर्गत देशातील विविध संस्थांवर आणि विशेषत: निवडणूक आयोगावर कब्जा करण्यात आला आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासोबत मिलीभगत करून निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोणत्याही निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी मोठा वेळ दिला जातो, तो थेट पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला अनुसरून असतो, असेही त्यांनी म्हटले. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींनी आरोप केला की, सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये कायदा बदलला, ज्यामुळे कोणत्याही निवडणूक आयुक्ताला त्याच्या निर्णयासाठी शिक्षा करता येणार नाही. 'इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी असे केले नाही,' असा दावा त्यांनी केला.
राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर हल्ला चढवताना म्हटले की, महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या (आरएसएसच्या) प्रकल्पाचा पुढचा भाग हा भारताच्या संस्थात्मक संरचनेवर ताबा मिळण्याचा होता. 'आरएसएसने एकेक करून संस्थांवर ताबा करायला सुरुवात केली आहे. विद्यापीठांमध्ये कुलगुरूंची नियुक्ती कशी होते, हे सर्वांना माहीत आहे,' असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर केलेल्या या गंभीर आरोपांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याला महत्त्व न देता त्यांनी टोला लगावला. "राहुल गांधींच्या वक्तव्यावर मी बोलायला रिकामा नाही. माझ्याकडे तेवढा वेळ नाही. जर एखादी व्यक्ती विचार करुन बोलत असेल तर त्यावर मी उत्तर देईन. पण बकवास विधानांवर कशाला उत्तर देऊ," असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.