CM Devendra Fadnavis: "महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाजमाध्यमांवर मॉर्फिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही," असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांसोबत साधलेल्या संवादादरम्यान दिला. जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पत्रकारांना शुभेच्छा देऊन सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधताना महिलांच्या सशक्तीकरणासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले. महिलांना विविध क्षेत्रांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी, त्यांच्या सुरक्षेचे मुद्दे आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठीच्या सरकारी उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. राज्यमंत्री पंकज भोयरसुद्धा यावेळी उपस्थित होते.
महिला आणि माध्यम क्षेत्रातील आव्हाने
मुख्यमंत्र्यांनी माध्यम क्षेत्रातील महिलांसमोरच्या आव्हानांवर भाष्य करताना सांगितले की, “महिलांना मल्टीटास्किंग करत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. माध्यम क्षेत्रातील महिलांना तर २४ तास दक्ष राहावे लागते. व्यवसाय, घर आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना प्रत्येक टप्प्यावर अनेक संघर्ष करावे लागतात. महिला उद्योजकतेला चालना
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध क्लस्टर्समध्ये महिला उद्योजकांसाठी खास संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच, मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने १० हजार महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात प्रशिक्षित करण्याचे अभियान हाती घेतले आहे. भविष्यातील नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित असतील आणि महिलांनी त्यात आघाडीवर राहावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मीडिया मॉनिटरिंग
मॉनिटरिंगचा अर्थ असा आहे की, एक सिस्टम आम्ही उभी करतो ज्याच्यामध्ये सगळ्या ज्या बातम्या आहेत, त्याचे विभागीकरण होणार आहे. त्यातल्या ज्या बातम्या नकारात्मक असतील त्याचे जे खरे उत्तर आहे किंवा त्याच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या ज्यांनी अशा बातम्या दिल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंगचे प्रयोजन आहे. माध्यमांवरील तो अंकुश अजिबात नाही.
महिला अधिकाऱ्यांचे कौतुक
प्रशासनात काम करणाऱ्या महिला अधिकारी त्यांच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत असून या या कामात त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांपासून प्रशासनातील विविध विभागांत महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकारी आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.