‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 06:35 IST2025-08-03T06:33:16+5:302025-08-03T06:35:03+5:30

निमित्त होते दीक्षाभूमीवरील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे.  हा कार्यक्रम डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात पार पडला. सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचे दीक्षाभूमीशी अतुट असे नाते आहे. 

Chief Justice Gawai choked up while telling the story of the birth of the song Bhimaraya How did Suresh Bhatt write the song of Bhimaraya’s Vandan Hear the whole story | ‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी

‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी

आनंद डेकाटे - 

नागपूर : ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना.. आज घे ओथंबलेल्या अंकुरांची वंदना..’ कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेले हे केवळ एक गीत नव्हे तर ती बाबासाहेबांना अर्पण केलेली अनुयायांची भावना होय. त्यातील प्रत्येक शब्द हा हृदयातून बाहेर पडतो. त्यामुळेच हे गीत गाताना कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचा कंठ दाटून येतो. डोळे पाणावतात. अशीच काहीशी अवस्था देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांची झाली. त्यांनी या अजरामर गीताच्या निर्मितीची कहाणी सांगत संपूर्ण गीत सादर केले. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला. डोळे पाणावले. यावेळी संपूर्ण सभागृह स्तब्ध होऊन ऐकत होते.

निमित्त होते दीक्षाभूमीवरील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे.  हा कार्यक्रम डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात पार पडला. सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचे दीक्षाभूमीशी अतुट असे नाते आहे. 

कविवर्य सुरेश भट हे वडील रा.सू. गवई यांच्या मुंबईतील निवासस्थानी महिनाभर थांबले होते
सरन्यायाधीश गवई या कार्यक्रमात केवळ एक पाहुणे म्हणून सहभागी झाले नव्हते. तसे त्यांनी आपल्या भाषणातही सांगितले. यावेळी सरन्यायाधीशांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. यातीलच एक म्हणजे भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना या अजरामर गीताच्या निर्मितीची होय. 

सरन्यायाधीश म्हणाले, मी तेव्हा बी.काॅमला शिकत होतो. दीक्षाभूमीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त माझे वडील रा.सू. गवई यांनी कविवर्य सुरेश भट यांना एक भीम वंदना लिहिण्याची विनंती केली. यासाठी सुरेश भट हे त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी महिनाभर थांबले होते. या महिनाभरात त्यांची सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. या महिनाभरात सुरेश भट यांनी जे गीत तयार केले ते अजरामर झाले.

गीत निर्मितीचा मी साक्षीदार होऊ शकलो
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना.. आज घे ओथंबलेल्या अंकुरांची वंदना.. या अजरामर गीताच्या निर्मितीचा मी साक्षीदार होऊ शकलो, याचा खूप आनंद आहे, असे सांगतानाच सरन्यायाधीशांनी हे संपूर्ण गीतच सादर केले. 

यावेळी गीत गाताना सरन्यायाधीशांचा कंठ दाटून आला होता. त्यांचे डोळेही पाणावले होते. यावेळी सभागृहात अनेक न्यायाधीश, वकील, वरिष्ठ अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ते भावनिक झालेले बघून संपूर्ण सभागृह  स्तब्ध झाले होते. 

सरन्यायाधीश न्या. गवई यांनी या अजरामर गीतांच्या निर्मितीची सांगितलेली कहाणी आणि गायलेले गीत दीक्षाभूमीच्या इतिहासात एक खास भावनिक पान ठरले. 

Web Title: Chief Justice Gawai choked up while telling the story of the birth of the song Bhimaraya How did Suresh Bhatt write the song of Bhimaraya’s Vandan Hear the whole story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.