मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा पुढाकार; खासदारांची बोलावली बैठक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 15:25 IST2023-12-15T15:23:34+5:302023-12-15T15:25:24+5:30
मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका निश्चित करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा पुढाकार; खासदारांची बोलावली बैठक!
सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण चांगलच तापले आहे. या मुद्यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, राज्यात गाजत असेल्या मराठा आरक्षण या विषयावर राज्यातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका निश्चित करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. येत्या सोमवारी (१८ डिसेंबर) रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे ही बैठक होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नारायण राणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.
सध्या संसदेचे हिवाळी अधिवशन सुरु आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदार हे दिल्लीत उपस्थित आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीराजे यांनी बोलावलेल्या बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष करत आहे. त्यासाठी मोर्चे, आंदोलन, उपोषणही सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला छत्रपती संभाजीराजे यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. कायदेशीर प्रक्रियेची माहिती असल्याने त्यांनी हा पुढाकार घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना पत्र पाठविले होते.