"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 20:29 IST2025-04-27T20:19:59+5:302025-04-27T20:29:02+5:30

पहलगाम हल्ल्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या विधानावर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Chhagan Bhujbal has clarified Sharad Pawar statement regarding the Pahalgam attack | "शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण

"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण

Pahalgam Attack: पहलगाममध्ये  दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शरद पवार यांच्यापर्यंत देशभरातील नेत्यांनी या हल्ल्यावरुन संताप व्यक्त केला आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना ओळख विचारुन त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये कितपत सत्य आहे ते मला माहिती नाही, पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्त्रियांना सोडल्याचं दिसतंय असं वक्तव्य शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. त्यावरुन महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितांच्या नातेवाईकांना भेटा असा सल्ला शरद पवार यांना दिला होता. आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या त्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन नवा वाद उफाळून आला आहे. या आधीही दहशतवादी हल्ले झाले आहेत, त्यावेळी धर्माची चर्चा झाली नाही. देशात धार्मिक तेढ वाढेल असं काही करु नये असं आवाहन शरद पवारांनी केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांचे नातेवाईक यामध्ये मारले गेले आहेत त्यांनी काय सांगितलं ते ऐकावं आणि मत मांडावं असे म्हटलं होतं. दुसरीकडे शरद पवार यांनी  जाणीवपूर्वक तसे वक्तव्य केल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

"शरद पवार यांना सगळे कळते. कोण काय बोललं हे त्यांना माहिती असते. पाकिस्तानला आपल्याला टक्कर द्यायची असेल तर हिंदू मुस्लीम वाद वाढता कामा नये यासाठी त्यांनी मुद्दाम ती गोष्ट टाळली. तोच पाकिस्तानचा प्रयत्न आहे. कारण आपल्या देशात २२ कोटी मुस्लम असतील. या सगळ्यांबरोबर आपण लढत बसलो तर बाहेरच्या लोकांबरोबर कसे लढणार? म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक तसे वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करण्याचा प्रश्न नाही. त्यांना सगळं काही समजतं," असे छगन भुजबळ म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?

"दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हा जो निष्कर्ष काढला जातो, तो अधिक सावधान करणारा आहे. पर्यटकांना हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे? याबाबत मला माहिती नाही. पण तिथे जी लोकं होती, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसते आहे", असे विधान शरद पवार यांनी केले होते.

मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

"शरद पवार काय म्हणाले ते मी ऐकलं नाही. पण ज्यांचे नातेवाईक मारेल गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते. ते काय म्हणाले मी ऐकलं आहे. पवार साहेबांचे ते जर मत असेल तर त्यांनी ते जाऊन ऐकावं," अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

Web Title: Chhagan Bhujbal has clarified Sharad Pawar statement regarding the Pahalgam attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.