Chhagan Bhujbal News: आम्ही आमचा आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचे नाही का? शरद पवार यांना माझे सांगणे आहे की, शिवसेना सोडून तुमच्यासोबत आलो ते मंडल कमिशनसाठी आणि तुम्ही मंडल कमिशन लागू केले त्यासाठी तुमचे आभार मानले, पण आमचे आरक्षण जात असेल, तर आम्ही बोलायला नको का? मंडल आयोग येईपर्यंत सरकार आपापल्या पद्धतीने आरक्षण देत होते. आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का, अशी थेट विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना उद्देशून केली.
पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मराठा एक जात असेल पण ओबीसी ३७४ जाती आहेत, म्हणून त्या प्रत्येक जातीचा नुकसान होत आहे, म्हणून आम्ही कुणबी, माळी ,वंजारी समाजाच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे, दोन-चार दिवसात त्याच्यावर सुनावणी होईल. राजकीय आरक्षण अघोषित आहे, त्या ठिकाणी मराठा समाज पुढारलेला आहे, म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितले की, तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागास नाही. शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असतील तर ईडब्ल्यूएस पंतप्रधान मोदी यांनी दिले. आता सुदैवाने मागणी केल्यानंतर ओबीसी समिती तयार झाली आता त्यात वेगवेगळे मंत्री बोलायला लागले. हे बरोबर आहे की चूक आहे आणि ते सगळे लोकांसमोर यायला लागले आहे, त्याचा विचार सरकार करेल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?
उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, तेव्हापासून मराठा समिती अस्तित्वात होती, त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक शरद पवार होते. त्यात राष्ट्रवादीच्या बाजूने अजित पवार आणि जयंत पाटील होते, शिवसेनेच्या वतीने शिंदे आणि सुभाष, काँग्रेसच्या बाजूने थोरात आणि अशोक चव्हाण होते, आपण त्यावेळी बोलला नाहीत. शरद पवार यांचा आदर करतो, परंतु अलीकडे त्यांनी दोन वेळा असे म्हटले आहे की, दोन समित्यांमध्ये समतोल असावा आणि असे म्हटले आहे की, मराठा जी समिती आहे त्याच्यात इतर समाजाचे लोक आहेत तर त्यात कोण आहेत? गिरीश महाजन आणि ओबीसी समितीमध्ये कोणी नाही. आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
EWS मध्ये मराठा समाजाला ८ टक्के आरक्षण आहे
आज प्रश्न असा आहे की, आमच्यामध्ये आणखी मंत्री टाका, आम्ही आमचे आरक्षण वाचवण्यासाठी झगडतो आहे. इथे इडब्ल्यूएस मराठा आरक्षण असताना ओबीसीमध्ये वेगळे पाहिजे बोला ना तुम्ही आता. त्यावेळी एक भूमिका आणि यावेळी वेगळी भूमिका असे चालायचे नाही. २७ टक्क्यांमध्ये मराठा आरक्षण हवे आहे. आपल्याला ओपनमध्ये मराठा समाजाला संधी होती. आपण नाही म्हटले. मोदींनी जेव्हा EWS आणले त्यात मराठा समाजाला ८ टक्के आरक्षण आहे. आता तरीसुद्धा तुम्ही म्हणता की ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे. मी म्हटले की, तुम्ही सांगा आम्हाला मराठा आरक्षण वेगळे नको आम्हाला फक्त ओबीसीमध्ये पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व छगन भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा, अशा शरद पवार यांच्या सल्ल्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते, तेव्हा शरद पवार का गैरहजार राहतात, असा प्रतिप्रश्न भुजबळ यांनी केला.