Rafale Deal : सीबीआय गुन्हा दाखल करेल या भीतीनेच कायद्यात बदल; राफेलप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 16:40 IST2019-11-15T16:29:08+5:302019-11-15T16:40:40+5:30
Rafale Deal : सीबीआयने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती.

Rafale Deal : सीबीआय गुन्हा दाखल करेल या भीतीनेच कायद्यात बदल; राफेलप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
मुंबई : राफेल विमान खरेदीत कसा भ्रष्टाचार झाला आहे, याची माहिती याचिकेमध्ये होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधी गेल्या वर्षी जुलै 2018 मध्य़े सरकारने कायद्यामध्ये दुरुस्ती केली होती. यामध्ये लोकसेवकाविरोधात गुन्हे दाखल करण्यापूर्वी सरकारची मंजुरी घ्यावी लागेल, असे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये म्हटले गेले. हे प्रकरण सुरू असल्याचे सरकारला माहिती होते. त्यामुळे सरकारने हा बदल केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
सीबीआयने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा लोकसेवकांच्या विरोधातच असतो. एक नंबरचे लोकसेवक तेच आहेत. याचिकाकर्त्यांनी याचिकेमध्ये भ्रष्टाचाराची माहिती दिली होती. असे असेल तर सीबीआयने गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. मात्र त्यांनी तसे केले नाही, असे चव्हाण यांनी म्हटले.
लोकसभेमध्ये राफेलचा मुद्दा बनवून देशाची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले. यामुळे काँग्रेसचे राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी यासाठी उद्यापासून आंदोलने करण्यात येणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच राज्यात भाजपाचेच सरकार येणार असल्याच्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.