हुबळी-दादर-हुबळी एक्सप्रेसच्या कोचमध्ये बदल, जनरल डबा वाढवला
By रूपेश हेळवे | Updated: July 2, 2024 17:28 IST2024-07-02T17:28:08+5:302024-07-02T17:28:28+5:30
आता जनरल डब्याची संख्या ही ४ होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

हुबळी-दादर-हुबळी एक्सप्रेसच्या कोचमध्ये बदल, जनरल डबा वाढवला
सोलापूर : विभागातून धावणारी हुबळी-दादर-हुबळी एक्सप्रेसच्या कोचमध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यात आता एक प्रथम श्रेणी वातानुकूलित डबा कमी करून त्या ऐवजी एक जनरल डबा जोडण्यात येणार आहे. यामुळे आता जनरल डब्याची संख्या ही ४ होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
या गाडीला सध्या १ प्रथम श्रेणी वातानुकूलित, १ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, १ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ७ शयनयान, ३ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन एकूण १५ कोच होते. सुधारीत रचनेनुसार या गाडीला १ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, १ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ७ शयनयान, ४ जनरल, २ गार्ड ब्रेक वॅन असे एकूण १५ कोच असतील.
हा बदल ३ जुलै रोजी पासून हुबळी-दादर एक्सप्रेसला तर ४ जुलै पासून दादर - हुबळी एक्सप्रेसमध्ये परिवर्तन करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.